
मुंबई : मुलीच्या आत्महत्येनंतर सुरू असलेले राजकारण वाईट असून आम्हालाही जगू द्या, असे भावूक आवाहन दिशा सालियन हिच्या पालकांनी केले आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियनच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर या मुद्यावर पुन्हा राजकारण सुरू झाले होते. सध्या सुरू असलेल्या आरोपांमुळे आम्ही व्यथित झाले असून आमच्या जीवाचे बरं वाईट झाल्यास नेत्यांना जबाबदार ठरवण्यात यावे असेही दिशा सालियनच्या आई-वडिलांनी म्हटले. माध्यमांशी संवाद साधताना दिशा सालियनच्या आई भावूक झाल्या होत्या.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या सदस्यांसह दिशा सालियनच्या पालकांची भेट घेतली. या भेटीमध्ये दिशा सालियनच्या आई वडिलांनी महिला आयोगाकडे तक्रार अर्ज केला. त्यानंतर दिशाच्या आई-वडिलांनी माध्यमांद्वारे आवाहन केले. दिशाच्या आई म्हणाल्या की, मुलीच्या आत्महत्येबाबत पोलिसांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांना या आधीच सगळी माहिती दिली आहे. मुलीच्या आत्महत्येवर उगाच राजकारण करू नये असे आवाहनही त्यांनी केले. राजकीय नेत्यांकडून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे आमच्या मुलीचा दररोज मृत्यू होत असल्याचे त्यांनी सांगितले. या सगळ्या प्रकरणात आम्हाला खूप त्रास होत असून आमच्याही मनात आत्महत्येचे विचार येत आहे आणि जीवाचं काही बरं-वाईट झाल्यास आरोप नेत्यांना जबाबदार ठरवण्यात यावे असेही त्यांनी म्हटले.
दिशा सालियनच्या मृत्यूवरून सुरू असलेल्या आरोपांवरून आम्ही व्यथित झालो आहोत. आम्हाला जगू द्या आणि तुम्हीही जगा असे आर्जव दिशाच्या आई-वडिलांनी केले आहे. आमच्या मुलीची नाहक बदनामी होत असून हे प्रकार थांबले पाहिजे अशी विनंती दिशा सालियनच्या आई-वडिलांनी केली आहे.
ऑफिसमधील तणावामुळे दिशाने आत्महत्या केली असल्याचे तिच्या पालकांनी माध्यमांना सांगितले. व्यावसायिक डील रद्द होत असल्याचे तिने घरी सांगितले होते. त्या तणावात ती होती असेही पालकांनी सांगितले. आम्ही ज्यांना मतदान करतोय तेच आमच्या मुलीला बदनाम करत आहेत अशी खंतही दिशा सालियनच्या आईने व्यक्त केली. पोस्टमार्टेम अहवालात तिच्या मृत्यूचे कारण समोर आलं आहे. तरीदेखील तिच्यावर बलात्कार झाला, तिची हत्या झाली असे सांगून बदनामी का करत आहात, असा प्रश्नही दिशाच्या आईंनी उपस्थित केला.
महापौरांची महिला आयोगाकडे तक्रार, चौकशी सुरु
दिशा सालियन प्रकरणात कालच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहून भाजप नेते नारायण राणे असंवेदनशील राजकारण करून दिशा सालियन यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी करत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल महीला आयोगाला पत्र पाठवल्यानंतर आज पुन्हा भाजपचे नेते नितेश राणे यांनी दिशा सालियन बाबत ट्वीट केलं आहे. त्यामुळे दिशा सालियनच्या आई-वडिलांची भेट घेण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्य महिला आयोगाच्या दोन सदस्या त्यांच्या निवास्थानी दाखल झाल्या आहेत.
सुशांतसिंह राजपूत केसमधील दिशा सालियन प्रकरणात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महिला आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेतली आहे. मालवणी पोलिसांना ४८ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत माढा तालुक्यातील पिंपळनेर मधील स्नेहल मंगल कार्यालयात पक्षाचा जन संवाद कार्यक्रम पार पडला. यानंतर त्या माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
सुशांतसिंह आणि दिशा सालियान प्रकरणात महापौर पेडणेकर यांनी महिला राज्य आयोगाकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यांच्या आलेल्या अर्जाची आम्ही दखल घेतली असून मालवाणी पोलीस स्टेशनचे वरिष्ट पोलीस निरीक्षकांना या बाबतचा जो काही अहवाल आहे, तो 48 तासांमध्ये सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दिशा सालियनचा पोस्ट मॉर्टम रिपोर्ट तिच्या आई वडीलांना मान्य आहे. त्यांनी त्याला दुजोरा दिला असल्याचं देखील चाकणकर यांनी सांगितलं आहे.
दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार, सर्व पुरावे तयार, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट
दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार असून त्या संबंधित सर्व पुरावे तयार असल्याचं भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात सांगितले. दरम्यान अभिनेता सुशांत सिंह हा दिशा सालियनच्या हत्येचा पर्दाफाश करणार होता, म्हणून त्याची हत्या करण्यात आली असल्याचे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. तिने आत्महत्या केली नव्हती, तर तिची हत्या करण्यात आली असल्याचे राणे म्हणाले. यावेळी तिथे कोणत्या मंत्र्यांची गाडी होती ? असा सवालही यावेळी राणेंनी उपस्थित केला. राणेंनंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक गौप्यस्फोट केला आहे.
७ मार्चनंतर दिसा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार असून त्या संबंधित सर्व पुरावे तयार असल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आज केलाय. दरम्यान दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होऊ नये यासाठी शिवराळ भाषा वापरणं सुरू असल्याचं सांगत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केलीय.




