राजकारण

ओबीसींना दुखावून कोणतेही काम करणार नाही : संभाजीराजे

बीड: ओबीसी समाजाला दुखावून मी कोणतेही काम करू शकत नाही. जातीविषमता दूर करण्यासाठी माझा हा लढा आहे. कुठल्याही पक्षाच्या विरोधात माझा लढा नाही, अशी ग्वाही देतानाच लोकप्रतिनिधींनी आता मराठा समाजाला वेठीस धरू नये. सगळ्या पुढाऱ्यांनी कायद्याचा अभ्यास करून आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले.

खासदार संभाजीराजे छत्रपती हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज बीडमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ओबीसींबाबतची आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली. मी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहूंचा वंशज आहे, अठरा पगड जातीला एकत्र करण्यासाठी ही संवाद यात्रा काढली आहे. ओबीसीला दुखावून मी कोणतही काम करू शकत नाही. त्यामुळं मी तसं बोललो. पुढाऱ्यांनी आता समाजाला फसवू नये. जे खरं आहे ते सांगावं. १०२ व्या घटना दुरूस्तीने राज्याचे अधिकार संपुष्टात आले आहेत, असं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं.

मराठा आरक्षणासाठी मी राजीनामा दिला तर मार्ग निघणार का? निघत असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मी भेट घेतली. ते मराठा आरक्षणा संदर्भात सकारात्मक आहेत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या लढ्यात मी पाठीशी आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षण संदर्भात माझा अभ्यास सुरू आहे. मात्र बहुजनांच्या प्रश्नासंदर्भात सदैव त्यांच्या पाठीशी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

…तर मुख्यमंत्री करा

दरम्यान, बीडमध्ये एका कार्यक्रमात संभाजी छत्रपती यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना थेट मला मुख्यमंत्री करा, असं म्हटलं होतं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तुम्हाला मला जाब विचारायचा असेल तर आधी मला मुख्यमंत्रीपदावर बसवा, असे वक्तव्य त्यांनी केले होते. बीड दौऱ्यावर असलेल्या संभाजीराजे यांचा शुक्रवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी प्रवेश केला. संभाजी छत्रपती व्यासपीठावर असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु केली.

त्यावेळी संभाजी छत्रपती यांनीही आपला रुद्रावतार दाखवला. त्यांनी उलट संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर शाब्दिक हल्ला केला. तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर आजी-माजी मुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना विचारा. मात्र, त्यांच्याकडून तुम्हाला उत्तर मिळणार नाही. मला प्रश्न विचारायचे असतील तर प्रथम मला मुख्यमंत्री करा, असे संभाजी छत्रपती यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. मात्र, यानिमित्ताने संभाजी छत्रपती यांच्या मनातील मुख्यमंत्रीपदाची इच्छा ओठावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

संभाजी ब्रिगेडची ऑफर

या दौऱ्यात संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी संभाजीराजेंना प्रश्न विचारला. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा अशी मागणी आपण का करत नाही? त्यावर संभाजीराजे म्हणाले, प्रश्न विचारायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा. संभाजीराजेंना २००८-०९ सोबत घेऊन आम्ही यात्रा काढली होती. आम्ही त्यांना आपलं समजतो. संभाजीराजेंना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांना बाहेर पडावं लागेल. पक्ष काढावा लागेल. संभाजी ब्रिगेडमध्ये आम्ही त्यांचे स्वागत करतो. त्यांनी आमच्या पक्षात यावं नेतृत्व करावं, आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवू अशी ऑफर संभाजी ब्रिगेडने दिली आहे.

तसेच छत्रपती संभाजीराजे, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तर महाराष्ट्रातील राजकीय गणितं बदलतील असा विश्वास संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button