Top Newsराजकारण

खडसेंना पुन्हा धक्का; मुक्ताईनगर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांनी खान्देशातील कलावंतांसाठी काय केले? : गुलाबराव पाटील

मुक्ताईनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा मुक्ताईनगरच्या स्थानिक आमदाराने धक्का दिला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीतील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातल्या राष्ट्रवादीच्या तरुण शेकडो युवकांनी आज स्थानिक आ. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधले.

याआधी बोदवड नगरपंचायतीमध्ये एकनाथ खडसे यांना चंद्रकांत पाटील यांनी हादरा दिला होता. त्यापाठोपाठ हा खडसेंना दुसरा धक्का मानला जात आहे. एकीकडे शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत एकनाथ खडसेंचे वाकयुद्ध रंगले आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी नांदत असली, तरी जळगावात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष जोरदार होताना दिसत आहे.

नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, बोदवडकरांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला आहे तो विकासकामांच्या माध्यमातून सार्थ करून दाखवणार आहे. बोदवडच्या विकासासाठीच भाजप शिवसेनेसोबत आली आहे. जिल्ह्यातील आगामी निवडणुकांमध्ये भाजप सेना सोबत राहील का? याबाबत विचारले असता त्यांनी भाजपचे भाजपला विचारा, ते तयार असतील तर आम्ही तयार असल्याचे ते म्हणाले होते. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे त्यामुळे जिल्ह्यातील आगामी काळातील निवडणुकांमध्ये भाजप सेनेची युती होऊन राजकीय समीकरणे बदलाचे संकेत मिळाले आहेत.

मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांनी खान्देशातील कलावंतांसाठी काय केले?- गुलाबराव पाटील

मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्या व केवळ पदे मिळवून ताफा घेऊन फिरणाऱ्या खान्देशातील नेत्यांनी येथील लोककला व कलावंतांसाठी काय केले, असा सवाल करीत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना रविवारी पुन्हा एकदा जळगावात टोला लगावला.

खान्देश लोककलावंत विकास प्रतिष्ठानच्यावतीने खान्देशातील पहिले वहीगायन लोककला संमेलन जळगाव येथे झाले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी गुलाबराव पाटील बोलत होते. त्यावेळी त्यांनी खडसे यांचे नाव न घेता त्यांना कलावंतांच्या प्रश्नावरून टोला लगावला.

बोदवड नगरपंचायत निवडणुकीपासून गुलाबराव पाटील व खडसे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. त्यात दोन दिवसांपूर्वीच गुलाबराव पाटील यांनी अहमदनगर येथे एका कार्यक्रमात आमच्याकडे खडसे यांच्यासारखे डाकू आहे, असे वक्तव्य केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना शनिवारी खडसे यांनी नशिराबाद येथे गुलाबराव पाटील हे उच्च शिक्षित, निर्व्यसनी असल्याचा टोला लगावत चोर संबोधले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा पाटील यांनी खडसे यांना टोला लगावला.

खान्देशातील लोककला असो की कलावंतांचे प्रश्न असो, या विषयी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, खान्देशातील नेत्यांनी मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहिली. आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होतो, असा दावा करीत केवळ पदे मिळविण्याची कामे या नेत्यांनी केली. पदे मिळवायची व ताफा मागे घेऊन फिरायचा एवढेच त्यांना करता आले. जिल्ह्यासाठी काय काम केले व काय दिवे लावले, असा सवालही पाटील यांनी करीत खडसे यांना चिमटा काढला. यात नाव घेतले नसले तरी ज्यांनी ही स्वप्ने पाहिले, त्यांना हा प्रश्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट करून टाकले.

खडसे यांना डाकू म्हटल्याविषयी पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, डाकू हा बोलीतील प्रचलित शब्द आहे. मी आमच्याकडे गिरीश महाजन, एकनाथ खडसे यांच्यासारखे डाकू असल्याचे म्हटले होते. त्याचा अर्थ ते बंदूक घेऊन फिरणारे डाकू आहे, असा होत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी केले. ‘नाक खाजे, नकटी खिजे’, असा अशी गत झाली असून त्यांना दुसरा धंदा उरला नसल्याचेही शेवटी त्यांनी बोलून दाखविले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button