
मुंबई : राफेल फायटर जेटच्या व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याची बाब उघड करून काँग्रेसने या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी लावून धरली होती. परंतु मोदी सरकारने हे प्रकरण चौकशीविनाच गुंडाळले. हा संपूर्ण व्यवहारच संशयास्पद असल्याने फ्रान्स सरकारने आता या राफेल घोटाळ्याच्या चौकशीला सुरुवात केली आहे. या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असून फ्रान्समध्ये चौकशी होऊ शकते तशी भारतातही या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
यासंदर्भात पटोले म्हणाले की, मोदी सरकारने २०१६ मध्ये फ्रांसच्या डसॉल्ट एव्हिएशन कंपनीकडून ३६ राफेल विमानांची खरेदी केली. काँग्रेसच्या काळात जे विमान ५२६ कोटी रूपयांना खरेदी करण्याचे ठरले होते. तेच विमान मोदी सरकारने १६७० कोटी रूपयांना खरेदी केले. काँग्रेस सरकारने १२३ राफेल खरेदीचा व्यवहार करत होते पण मोदी सरकारने तर ३६ राफेलचाच व्यवहार केला आणि जनतेच्या तिजोरीतून ४१ हजार २०५ कोटी रूपये अतिरिक्त मोजले. ही विमाने महाग का झाली? या व्यवहारात कोणा-कोणाचे खिसे भरले? याचे उत्तर मोदी सरकारने आजपर्यंत दिलेले नाही. डसॉल्टने भारतातील मध्यस्थाला एक दशलक्ष युरो एवढी रक्कम दिली. २०१७ मध्ये डसॉल्ट ग्रुपच्या बँक खात्यातून ‘गिफ्ट टू क्लाएंट’ म्हणून ही रक्कम ट्रान्सफर करण्यात आली होती. फ्रान्समधील भ्रष्टाचारविरोधी तपास संस्था AFA ने डसॉल्टच्या बँक खात्यांचे ऑडिट केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. यावरून राफेल खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले आहे. आज फ्रान्समध्ये राफेल घोटाळ्याची चौकशी सुरु झाली आहे, या चौकशीत फ्रान्सच्या आजी माजी राष्ट्राध्यक्षांची चौकशी होणार आहे मग भारतातच चौकशीला मोदी सरकार का घाबरत आहे ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्थान एरॉनॉटिक्स या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला मिळणारे ३० हजार कोटींचे कंत्राट, राफेल खरेदी कराराच्या १२ दिवसापूर्वी स्थापन झालेल्या रिलायन्स डिफेन्स या खाजगी कंपनीला देऊन १ लाख कोटी रुपयांचे लाईफ सायकल कंत्राट देऊन अनिल अंबानीचा फायदा करुन दिला. राफेल लढाऊ विमान खरेदीत देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात खोटी माहिती देऊन व असत्य बोलून न्यायालयाची दिशाभूलही केली आहे. सोबतच संसदेच्या विशेष अधिकाराचे उल्लंघनही केले आहे. राफेल घोटाळा हा देशाचे नुकसान करणारा, देशाची सुरक्षा धोक्यात आणणारा आहे.
राफेल व्यवहाराची फ्रान्समध्ये चौकशी होऊ शकते तर भारतात का नाही ? : थोरात
राफेल फायटर जेटच्या व्यवहारात गौडबंगाल असून या व्यवहारात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्याने उघड केले. या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणीही केली परंतु मोदी सरकारने या व्यवहाराची चौकशी न करता प्रकरण गुंडाळले. परंतु सत्य जास्त दिवस लपत नसते आज फ्रान्समध्ये राफेल व्यवहाराची चौकशी सुरु झाली असून, मग भारतातच राफेल व्यवहाराची चौकशी का केली जात नाही, असा सवाल उपस्थित करून सत्य जनतेसमोर येण्यासाठी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी महसूलमंत्री व विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
यासंदर्भात थोरात म्हणाले की, युपीए सरकारच्या काळातच १२६ राफेल फायटर जेट विमाने प्रत्येकी ५५६ कोटी रुपयांनी खरेदी करण्याचे निश्चित झाले होते परंतु त्यानंतर आलेल्या मोदी सरकारने याच फायटर जेटसाठी भरमसाठ असे १६७० कोटी रुपये देऊन व्यवहार केला. हा व्यवहार करताना अनेक बाबींना फाटा देण्यात आला. तसेच मोदींच्या उद्योगपती मित्रांचा फायदा व्हावा यासाठी या क्षेत्रातील काहीही अनुभव नसलेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीला याचे कंत्राट देण्यात आले. या संपूर्ण व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले होते परंतु त्यांच्याकडे नेहमीप्रमाणे मोदी सरकारने दुर्लक्ष करुन हे प्रकरण गुंडाळले.
राफेल व्यवहारात गडबड झाल्यानेच फ्रान्समध्ये याची चौकशी सुरु झाली आहे. मग भारतातच या व्यवहारावर पांघरुण घालण्याचे काम का केले जात आहे. मोदी सरकार चौकशी करायला का घाबरत आहे आणि कोणाला वाचवण्यासाठी चौकशीपासून पळ काढला जात आहे. राफेल व्यवहार जर स्वच्छ व पारदर्शी झाला असेल तर मोदी सरकारने त्याची चौकशी करून जनतेसमोर सत्य आणले पाहिजे. अन्यथा राहुल गांधी म्हणतात तसे ‘चौकीदार ही चोर है’ हेच सत्य आहे असे थोरात म्हणाले.




