डॉ. अनुप मरार हे भाजपचे पदाधिकारी कसे? ही मराठा समाजाशी गद्दारी नाही का?; काँग्रेसचा सवाल

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वर्तुळात आरोपांच्या फैरी झडल्या आहेत. मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात लढाई लढणाऱ्या सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन या संस्थेचे भाजप कनेक्शन समोर आले आहे. मराठा आरक्षणाला निकराने विरोध करणाऱ्या #SaveMeritSaveNation संघटनेचे मूळ संस्थापक ज्यांनी स्वतःचा पत्त्यावर ही संस्था स्थापन केली ते डॉ अनुप मरार हे भाजपाचे पदाधिकारी कसे? असा सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे. तर भाजपने यावर उत्तर द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत आरक्षण विरोधी लोकं संस्थांना रसद पुरवून भाजपची मराठा समाजाशी गद्दारी नाही का? असा सवालही काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाविरोधात जो निकाल दिला त्याला सर्वस्वी भाजप आणि केंद्र सरकार जबाबदार असताना त्याचे खापर महाविकास आघाडीवर फोडण्याचे काम सातत्याने भाजपकडून करण्यात येत आहे. त्याच करता जनतेची दिशाभूल व्हावी म्हणून मराठा आरक्षणासाठी ५ जूनला आंदोलन काढण्याचे ठरवले आहे. भाजपची ख्याती ही सुपर स्प्रेडर म्हणून आहे. पाच राज्यांच्या निवडणूकांदरम्यान कोरोनाचा हाहाकार कसा काय झाला यासाठी भाजपचे बेजबाबदार वर्तन कारणीभूत होतं आणि ते लोकांसमोर आहे. महाराष्ट्रातही असा कोरोनाचा हाहाकर उडाला तर याची जबाबदारी भाजपची राहील अशा इशारा देत असल्याचे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणाला निकराने विरोध करणाऱ्या #SaveMeritSaveNation संघटनेचे मूळ संस्थापक ज्यांनी स्वतःचा पत्त्यावर ही संस्था स्थापन केली ते डॉ अनुप मरार हे भाजपाचे पदाधिकारी कसे? @BJP4Maharashtra ने उत्तर द्यावे. @ChDadaPatil जी ही भाजपा ची मराठा समाजाशी गद्दारी नाही का? pic.twitter.com/qNrljdm5vo
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 28, 2021
आरक्षणाच्या बाजूनं आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करायचा हा भाजपचा उद्देश असला तरी त्यांचा हेतू आरक्षणाच्या विरोधात होता हे दिसून येत आहे. याचे कारण आरएसएसची भूमिकाच मराठा आरक्षणाच्याविरोधात राहिली आहे. जी संस्था सेव्ह मेरिट सेव्ह नेशन ही मराठा आरक्षणाच्या विरोधात लढा देत होती. कोल्हापुरातील मराठा समाजाने ज्या संस्थेच्या विरोधा आंदोलन केले होते त्या संस्थेच्या पाठीशी भाजप असल्याचे चित्र समोर आले आहे.
सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या संस्थेचे नागपूर कनेक्शन उघड झाले आहे. याचे उत्तर आता भाजपने दिले पाहिजे. मराठा आरक्षणाला निकराने विरोध करणाऱ्या #SaveMeritSaveNation संघटनेचे मूळ संस्थापक ज्यांनी स्वतःचा पत्त्यावर ही संस्था स्थापन केली ते डॉ अनुप मरार हे भाजपाचे पदाधिकारी कसे? भाजपने याचे उत्तर द्यावे तसेच ही मराठा समाजाशी गद्दारी नाही का असा प्रश्न काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केला आहे. डॉ अनुप मरार व इतर संघाशी संबंधित या संस्थेचे विश्वस्त नागपुरात मराठा आरक्षणाविरोधात मोर्चे काढत होते तेव्हा भाजपा गप्प का होती? न्यायालयात हे लोक मराठा आरक्षणाला विरोध करत होते तेव्हा भाजपा गप्प का होती? हे मूक समर्थन होते का? मागून पाठिंबा दिला का? याचेही उत्तर द्या अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.