दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपती बाप्पाचा आगमन सोहळा जसा मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर, अंबानीच्या अंतालिओ बंगल्यावर तसाच तो खेड्यात राहणार्या माणसाच्या झोपडीत पण झाला आहे.फरक एवढाच आहे की झोपडीतला माणूस काहीच मागत नाही मात्र वर्षा बंगल्यात असणार्याला सतत गार्हाणी मांडावी लागतात,लोकांचा आधार घेऊन बाप्पाला साकडे घालावे लागते.सामान्य माणूस हे दहा दिवस आनंदात घालवतो गेल्या दोन वर्षात कोरोना काळात बाप्पा काहीच करू शकला नाही,तो कधीच काही करू शकत नाही याचे गुपित गावात राहणार्या माणसाने कधीच ओळखले आहे.
आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आजोबा केशव सीताराम ठाकरे प्रबोधनकार ठाकरे या नावाने ओळखले जायचे ,आजही इतिहास त्यांना याच नावाने ओळखतो.त्यांनी गणपती बाप्पाला चांगलेच ओळखले होते. त्यांनी बाप्पाची करून दिलेली ओळख आजच्या काळात त्यांच्याच शब्दात सांगितली तरी दंगे उसळतील एवढे ते जहाल आहे.उद्धव काय किंवा राज काय ? प्रबोधनकारांची ही सगळी नातवंडे चाणाक्ष आहेत.आपल्या पेक्षा गणपती बाप्पा खर्या अर्थाने त्यांनीच ओळखला आहे आपण सगळे खरंतर मायेचे मइंद ठरले आहोत हे लक्षात घ्या.विवेकानंद म्हणत असत, देव कधीच काही करीत नसतो ,त्याला आधार ठेऊन व्यक्तीला सगळे करावे लागते.त्यांच्या म्हणण्याचा मतितार्थ ज्यांना कळला ते खळखळाट करीत नसतात,स्वतःची खोली वाढवत पुढे जाताना दिसतात.
संतांनी देवाचे जे निर्गुण निराकार स्वरूप आपल्या अभंगातून मांडले आहे त्याचा सार विवेकानंद यांनी एका वाक्यात मांडला आहे.जे काहीच करीत नाहीत देव त्यांच्यासाठी काहीच करीत नाही .याचा अर्थ सरळ आहे,देव प्रयत्न करणार्याच्या पाठीशी असतो.आहे की नाही गम्मत ? संत असो कि विवेकानंद यांनी देव नाकारला आहे फक्त तो थेट शब्दात सांगितला नाही.समाजाला केवळ देवाच्या भरवश्यावर ठेवले तर प्रयत्न,कर्तव्य या पासून समाज दूर जाईल आणि एकवेळ अशी येईल की लोक दैववादी बनतील,दैववादी बनण्यात काय धोका असतो हे संत आणि महा पुरुषांना चांगलेच माहीत होते म्हणून तुम्ही प्रयत्न करीत राहा देव यश देईलच हा दिलासा सामान्य माणसाला संत देताना दिसतात.
प्रयत्न करण्याचा हा सल्ला चेहरा नसलेल्या कोणत्याही समाजाला जसा आहे तसाच तो राज्याचे नेतृत्व करणार्या सत्ताधारी लोकांना पण आहे.कोरोनाच्या काळात उभा देश बंदिशाला झालेला असताना ज्यांनी कोणतेही प्रयत्न न करता देश,राज्य देवाच्या भरवश्यावर सोडून दिले होते असेही नेते आता गणपती बाप्पाला चांगले दिवस येण्याचे गार्हाणे घालत आहेत.मुख्यमंत्री असो की विरोधी पक्षनेता हे कुठेही नतमस्तक झाले की स्वतःचे कर्तृत्व झाकण्यासाठी देवाला साकडे घालतात.हे साकडे,गार्हाणे किंवा प्रार्थना स्वतःच्या उणिवा झाकण्याचा सराईत प्रयत्न असतो. या लोकांनी अशी नाटके केल्यापेक्षा नाक घासून बाप्पांची माफी मागायला की होय, आम्ही चुकलो.
पंढरपूर असो, शिर्डी किंवा गणपती हे निर्ढावलेले नेते देवाला साकडे घालून मोकळे होतात त्याच वेळी स्वतःच्या चुकांची जाणीव त्यांना तीव्रतेने होत असते, आतून बेशरम पणाची हद्द ओलांडून चेहर्यावर नकली हास्य आणीत या सत्ता पिपासुनी खरंच समाजाला देवाच्या भरवश्यावर सोडले आहे हे आपल्या लक्ष्यात का येत नाही हा खरा प्रश्न आहे. देव सर्वव्यापी आहे हा आजच्या काळातील सर्वात मोठा विनोद पाचवीत जाणार्या विद्यार्थ्यांना कळत असेल तर तो अजून आपल्या शहाण्या माणसांच्या टाळक्यात का शिरत नसावा ?या प्रश्नाचे उत्तरही बाप्पाला मागायचे आहे का ?