धर्म आणि धार्मिकता या दोन बाबी मनुष्याच्या जगण्यासाठी आवश्यक असल्याचे फार पूर्वी मानले जात होते. जीवनात धर्माची आचारसंहिता आणि धार्मिक विधी नसतील तर तो समूह अनियंत्रित होईल, स्वैराचार माजेल, अशी भीती सगळ्याच धर्माच्या क्षेत्रात व्यक्त केली जात होती. त्यासाठी जगातल्या मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन आणि हिंदू या प्रमुख धर्मात अनुयायांचे जीवन धार्मिक आचारसंहितेने बंदिस्त केले आहे. धर्मग्रंथ आणि धार्मिक आचारसंहिता म्हणूनच प्रत्येक धर्माचा अनुयायी काटेकोर पाळताना दिसतो. जगभरात सगळे धर्म ज्या काळात निर्माण झाले त्यावेळी विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा विकास झाला नव्हता.
युरोपमध्ये विज्ञान बाळसे धरत होते, मात्र धर्म राजसत्तेवर प्रभावी असल्याने प्राचीन धर्मग्रंथात जे सांगून ठेवले असेल त्याच्या पलीकडे कोणते ज्ञान असू शकते हे मान्य करायला कुणीच तयार नव्हते. त्याचे परिणाम गॅलिलिओपासून अनेकांना भोगावे लागले. पुढे सगळ्याच धर्मातील अनुयायी अभ्यास करू लागले. आधुनिक विज्ञानाचा वापर वाढल्यावर प्रत्येकाच्या मेंदूतील तर्काची चाळणी काही प्रमाणात काम करायला लागली. त्यातून धर्मग्रंथातील मजकूर, तर्क आणि अनुभव यांची सांगड घालायला सुरुवात झाली. जगभर त्यातून धर्म चिकित्सा सुरू झाली. इतर सगळ्या धर्मात मोठी स्थित्यंतरे होत होती, मात्र मुस्लिम धर्मात दीर्घकाळ काहीच हालचाल होताना दिसत नव्हती.
सत्तरच्या दशकात महाराष्ट्रात मुस्लिम विचारवंत हमीद दलवाई यांनी पुढाकार घेऊन इस्लाममधील वाईट प्रथांवर बोलायला सुरुवात केली. मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापन करून प्रामुख्याने मुस्लिम महिलांच्या होणार्या शोषणाच्या विरोधात दलवाई यांनी मोठी आघाडी उघडली होती. अर्थात कट्टर लोकांनी त्यांना प्रचंड त्रास दिला. मुल्ला, मौलवी यांच्या धर्मसत्तेला त्यांनी आव्हान देताना प्रेषित मुहंमद आणि कुराणचा आदर करीत बर्याच सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही चळवळ पुढे फोफावू शकली नाहीय; परंतु तिने असंख्य बुद्धिवादी मुस्लिम तरुणांना स्वतःची बुद्धी वापरून विचार, चिंतन आणि मनन करण्याची प्रेरणा दिली.
धार्मिक आज्ञा पाळण्याच्या बाबतीत इस्लाम हा सर्वात कट्टर धर्म म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्यांच्यात काहीच सुधारणा होऊ शकत नाही, हा समज पक्का झाला असताना कोरोना संकटाने त्याला मोठा धक्का दिला. मुस्लिम धर्मात चिकित्सक नव्हे तर चक्क नास्तिक विचारधारा रुजत असून, हजारो लोक हा धर्म त्यातून स्वतंत्र बुद्धीने विचार करायला लागले आहेत हे आशादायक चित्र निर्माण केले आहे.एक्स मुस्लिम मुव्हमेंट या नावाखाली आजच्या घडीला जगभरातील हजारो बुद्धिवादी मुस्लिम एकत्र होत आहेत. युट्यूबवर आज या गटाचे किमान हजार तरी चॅनेल सुरू झाली आहेत. सचवाला, आझाद ग्राउंड, आमेना सरदार, या चॅनेलवर तर दररोज अतिशय विवेकी चर्चा सुरू असतात. कुराण, हदीस यांच्यातील सुरा, आयते यांचा संदर्भ देत अतिशय विवेकी चर्चा करताना जगभरातील मुस्लिम, तरुण, तरुणी त्यात भाग घेत आहेत. भारतीय लोकांची सुद्धा अनेक चॅनल्स आणि समूह तयार झाले आहेत.सध्या जरी कुणी आपली ओळख दाखवत नसले तरी हा धर्म चिकित्सेचा विचार त्यांच्या मेंदूत निर्माण होणे आणि धर्म निरपेक्ष भारताची उभारणी करण्याच्या दिशेने त्यांचे चिंतन असणे ही मोठी प्रेरणादायी घटना या शतकात घडत असल्याने हे एकूणच चित्र आपल्या देशासाठी मोठे आशादायी आहे. कुणाच्याही गुलामीत खितपत पडण्यासाठी आपला जन्म नाही ही मुस्लिम तरुणांमध्ये होत असलेली जाणीव उद्याच्या मजबूत भारताची आशा आहे.