Uncategorized

मनसुख हिरेन यांचा मृत्यू बुडूनच; ठाणे पोलिसांचा प्राथमिक अहवाल

शवविच्छेदनाचा व्हिडिओ मिळाल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेणार; हिरेन कुटुंबीयांची भूमिका

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातील मुंब्रा रेतीबंदर याठिकाणी सापडला होता. या मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल ठाणे पोलिसांमार्फत जाहीर करण्यात आला आहे. मनसुख हिरेन यांचा मृत्यू बुडूनच झाल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे.

ठाणे पोलिसांकडून हा अहवाल आता मुंबई पोलिसांना माहितीसाठी पाठवण्यात आला आहे. या शवविच्छेदन अहवाल प्रकरणात ठाणे पोलिसांकडून आणखी एक सल्ला घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

शवविच्छेदनाचे व्हिडिओ द्या, तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही, हिरेन कुटुंबीयांची भूमिका

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या कारणावर राजकारण तापलेले असतानाच, आता त्यांच्या कुटुंबीयांनीही या प्रकरणात समोर येऊन बोलायला सुरूवात केली आहे. जोपर्यंत मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल सार्वजनिक करत नाही, तोवर आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका आता कुटूंबीयांनी घेतली आहे. मनसुख हिरेनच्या कुटूंबीयांनी पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे यांना ही माहिती दिली आहे. अटोप्सी अहवाल, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण आणि शवविच्छेदनाचे छायाचित्रिकरण आम्हाला द्या अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. तोवर आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असे स्पष्ट केले आहे. दरम्यान मनसुख हिरेन प्रकरणातील प्राथमिक पोस्टमार्टम रिपोर्ट ठाणे पोलिसांना प्राप्त झाला आहे. पण यामध्ये मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नाही. त्यामुळेच मनसुख हिरेन यांचा व्हिसेरा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार आहे.

मनसुख हिरेन यांच्या मृतदेह जेव्हा ठाण्यातील मुंब्रा रेतीबंदर येथे आढळला होता, तेव्हा त्यांच्या शरीरावर कोणत्याही खुणा नसल्याचे स्पष्टीकरण ठाणे पोलिसांनी दिले होते. तसेच मृत्यूच्या वेळी त्यांचे हात बांधले नव्हते असाही खुलासा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. हिरेन यांच्या तोंडात कोंबलेल्या रूमालामुळेही या प्रकरणात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. तर हिरेन यांच्या शवविच्छेदनाच्या वेळीही मुंबई पोलिसांमधील अधिकारी सचिन वाझे हजर होते असा आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला होता.

सचिन वाझेंनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट

पोलीस अधिकारी सचिन वाझे शनिवारी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना भेटले. तब्बल तीन तास वाझे आणि आयुक्त परमबीर सिंग यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना सचिन वाझे म्हणाले की, मनसुख हिरेश यांच्या मृत्यूनंतर जवळपास चार ते साडे चार तासानंतर मी कळवा हॉस्पिटलला पोहोचले होतो. त्यामुळे त्यांना त्याच्या मृतदेहासोबत रुमाल आढळला, याबद्दल मला काही माहीत नाही आहे. तसेच मला त्यांच्या कुटुंबीय काय म्हणाले?, त्याप्रकरणात कोण अधिकारी होते? याबाबत काहीच माहिती नाही.

पोलीस-पत्रकारांनी मानसिक छळ केला; मृत्यूपूर्वी हिरेन यांची तक्रार

मनसुख हिरेन यांनी मृत्यूपूर्वी पोलीस आयुक्त मुंबई, ठाणे आणि गृहमंत्री यांना लिहलेले पत्र समोर आलं आहे. यामध्ये पोलिसांच्या नावासह काही पत्रकारांच्या नावांचा उल्लेख देखील केला आहे. पोलीस आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत मनसुख यांनी पोलीस आणि पत्रकारांकडून माझा मानसिक छळ झाला असल्याचे म्हटले आहे.

मनसुख हिरेन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता विक्रोळी पोलीस ठाण्यातून त्यांना एक फोन आला. त्यानंतर घाटकोपर पोलीस ठाण्यातूनही ३ वाजता फोन आला. १ मार्च रोजी संध्याकाळी ४ वाजता नागपाडा एटीएसमधून फोन आला. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या सीआययू ऑफिसमध्ये बराच वेळ चौकशी करण्यात आली. बराच वेळ सुरू असलेल्या चौकशीत सातत्याने परत परत प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर एनआयएने ही चौकशी केली. पुणे शाखेचे सहपोलिस आयुक्त मिलिंद भारांबे यांनीही या प्रकरणात चौकशी केली. विक्रोळी पोलिस, घाटकोपर पोलिस, नागपाड्याचा एटीएस विभाग, गुन्हे गुप्तवार्ता विभाग, गुन्हे शाखा आणि केंद्रीय संस्था एनआयएकडूनही वारंवार चौकशी करून मला तासनतास बसवून ठेवण्यात आले होते असेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. यासोबतच विविध तपास यंत्रणांकडून झालेल्या चौकशीमुळे मानसिक स्वास्थ बिघडल्याचे मनसुख हिरेन यांनी तक्रारीत नमूद केले आहे. कित्येक माध्यमांच्या पत्रकारांकडून सतत फोन येत आहेत. यावेळी एका पत्रकाराने कित्येक फोन करुन या प्रकरणातील संशयित असल्याचे देखील सांगितल्याचं मनसुख हिरेन यांनी या तक्रारीत म्हटले आहे. या पुढे त्यांनी असेही म्हटले की, अनेक प्रसारमाध्यमांकडून मला वारंवार फोन येत असल्याने माझा मानसिक छळ होत असून या प्रकणात माझ्या कुटुंबियांना देखील त्रास होत आहे. तसेच, मला आरोपीला सारखी वागणूक दिली जात आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण आहे हे मला माहित नाही, पण माझा छळ होतोय. या प्रकरणात माझ्या स्कॉर्पिओ गाडीचा गैरवापर होत आहे, असे यापूर्वी देखील मी माझ्या जबाबात स्पष्ट केलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button