मुंबई : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी आता भाजपचे आ. नितेश राणे चांगलेच अडचणीत येताना दिसत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने आमदार नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला त्यानंतर नितेश राणेंनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. मात्र, आता हायकोर्टाने नितेश राणे यांना सर्वप्रथम सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हा नितेश राणे यांच्यासाठी एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.
सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे नितेश राणे यांनी मुंबई हायकोर्टात जामीन अर्ज केला. १११ पानांचा जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.
सिंधुदुर्ग न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला. कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी नितेश राणे यांची गाडी थांबवली. यावेळी नितेश राणे यांचे भाऊ माजी खासदार निलेश राणे यांनी पोलिसांना अडवलं. यावेळी निलेश राणे आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. नितेश राणे यांच्या जामीन अर्जाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे. त्यामुळे आम्हाला जाऊ द्या. कोर्टाची ऑर्डर द्या, असं निलेश राणे आक्रमकपणे पोलिसांना म्हणाले.
जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यासाठी निघाले होते. ते आपले वकील सतीश मानेशिंदे यांच्यासोबत कोर्टाबाहेर पडले आणि गाडीत बसले. यावेळी सिंधुदुर्ग पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. पोलिसांचा मोठा ताफा आजूबाजूला जमा झालेला बघायला मिळाला. पोलीस नितेश राणे यांना आता अटक करतील, अशी शक्यता होती. पण नितेश राणे यांचे भाऊ निलेश राणे धावून आले. त्यांनी पोलिसांसोबत बाचाबाची केली. पोलिसांना अटक करण्याचा अधिकार नाही, असं निलेश राणे ठामपणे म्हणाले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी देखील पोलिसांसमोर तीच भूमिका मांडली. अखेर मानशिंदे यांना कोर्टात जाऊन सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची प्रत दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जाण्यास परवानगी दिली.
निलेश राणेही अडचणीत, सिंधुदुर्गात गुन्हा दाखल
त्यातच आ. नितेश राणे यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे हे सुद्धा अडचणीत येताना दिसत आहेत. निलेश राणे यांच्या विरोधात सिंधुदुर्गात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल (१ फेब्रुवारी) सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला त्यानंतर निलेश राणे हे आमदार नितेश राणेंसोबत जायला निघाले असता पोलिसांसोबत त्यांचा वाद झाला. या प्रकरणात आता निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी खासदार निलेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाच्या आवारात हुज्जत घातल्या प्रकरणी निलेश राणेंसह भाजपच्या अन्य पाच जणांवर ओरोस पोलीस स्थानकात रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १८८, २६९, २७०, १८६ या कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल नितेश राणे यांच्या सुनावणीनंतर न्यायालया बाहेर हाय व्होल्टेज ड्रामा रंगला होता. जमाव केल्याप्रकरणी आणि पोलिसांशी हुज्जत, शांततेचा भंग केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल केले आहेत. व्हिडीओ शूटिंग पाहून अन्य जणांवर ही गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे समजते.
सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाच्या बाहेर झालेल्या गोंधळानंतर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी पोलीस अधिक्षकांना पत्र लिहून निलेश राणेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. आपल्या पत्रात वैभव नाईक यांनी म्हटलं, १ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ३ च्या सुमारास सत्र न्यायालयाच्या बाहेर निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जमावबंदी आदेश असतानादेखील याठिकाणी बंदोबस्ताकरिता तैनात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी स्वत: आणि समर्थकांनी अरेरावी करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. सदर घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण विविध वृत्तवाहिन्यांवरुन प्रसारीत झाले आहे. तरी आपण चौकशी करुन निलेश राणे आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा.