राजकारण

मुंबईतील नगरसेवकांची संख्या वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी अशी याचिका भाजप नगरसेवक अभिजीत सामंत आणि राजश्री शिरवडकर यांनी केली होती. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली.

न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी करताना मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग वाढवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार देत राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला २१ डिसेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. याशिवाय, राज्य निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना २२ डिसेंबरला होणाऱ्या पुढील सुनावणीला हजर राहण्यासाठी नोटीस काढली आहे.

मुंबई महानगरपालिकेतील सदस्य संख्या वाढीच्या प्रस्तावाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या २२७ वरुन २३६ होणार आहे. महापालिकेतील सदस्य संख्या वाढवून प्रभागात बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने ऑक्टोबरमध्ये घेतला होता. या संदर्भातील प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात आला होता. राज्यापालांनी इतर पालिका प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मात्र मुंबई पालिकेचा प्रस्ताव प्रलंबित होता. दरम्यान, आता राज्यपालांच्या मंजुरीनंतर मुंबई पालिकेतील सदस्य संख्या वाढीच्या निर्णयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

२०११च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार २००१ ते २०११ या दशकात मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लोकसंख्येमध्ये ३.८७ टक्के इतकी वाढ झाली आहे. लोकसंख्येमध्ये झालेली ही वाढ, वाढते नागरीकरण याबाबी विचारात घेऊन वाढीव प्रतिनिधीत्व निश्चित करणं आवश्यक होते. त्यानुसार निर्वाचित सदस्यांची संख्या वाढविण्याचं २७ ऑक्टोबरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरवण्यात आलं. त्यानुसार निर्वाचित सदस्य म्हणजेच नगरसेवकांची संख्या २३६ अशी करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. दरम्यान, या प्रस्तावाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूरी दिल्याने लवकरच मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या २३६ होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button