हैबतुल्ला अखुंदजादा अफगाणिस्तानचा सर्वोच्च नेता; तालिबानची घोषणा
काबूल : अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर याठिकाणी सत्ता स्थापणेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, तालिबानने मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादा हे त्यांचा सर्वोच्च नेता असतील, असे जाहीर केले आहे. टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, तालिबानने मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादा यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष देश चालवणार असल्याचे म्हटले आहे.
तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे सदस्य अनामुल्ला समांगनी यांनी कथितरित्या सांगितले की, मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादा हे देखील नवीन सरकारचे नेते असतील. तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे नेते शेर मोहम्मद अब्बास स्टानिकझाई यांचा हवाला देत म्हटले आहे की, इस्लामिक अमीरात येत्या दोन दिवसांत आपले नवीन सरकार जाहीर करेल.
तालिबान इराण मॉडेलच्या आधारे सरकार स्थापन करीत आहे. यात इस्लामी प्रजासत्ताक असेल जिथे सर्वोच्च नेते राज्याचे प्रमुख असतील. ते सर्वोच्च धार्मिक आणि राजकीय व्यक्ती देखील असतील.
टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, अनामुल्ला समांगनी यांनी सांगितले की, नवीन सरकार स्थापनेबाबत चर्चा जवळजवळ संपली आहे आणि मंत्रिमंडळाबद्दल आवश्यक चर्चा झाली आहे. आम्ही जाहीर करू ते इस्लामी सरकार लोकांसाठी आदर्श असेल. सरकारमध्ये कमांडर (अखुंदजादा) यांच्या उपस्थितीबद्दल शंका नाही. ते सरकारचे नेते असतील आणि याबाबत कोणताच प्रश्न उद्धवू नये.
कंधारमधून काम करतील अखुंदजादा?
मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादा हे याआधी कधी समोर आले नाहीत. त्यांच्या ठिकाणांबद्दल कोणाला खास माहिती नाही. ते नवीन सरकारमध्ये कंधारमधून काम करतील असे समजते. दरम्यान, एका रिपोर्टनुसार, पुढील सरकारमध्ये पंतप्रधान पदही असेल. तालिबानने यापूर्वीच विविध प्रांत आणि जिल्ह्यांसाठी राज्यपाल, पोलीस प्रमुख आणि पोलीस कमांडर नेमले आहेत.
इस्लामी अमीरात प्रत्येक प्रांतात सक्रिय आहे. प्रत्येक प्रांतात राज्यपाल काम करू लागले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा राज्यपाल आणि प्रांतातील एक पोलीस प्रमुख आहे जो लोकांसाठी काम करत आहे, असे तालिबानचा सदस्य अब्दुल हनान हक्कानीने म्हटले आहे.