समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राच्या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर
मुंबई : आयआयएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत दाखल याचिकेवर मुंबई जिल्हा जात पडताळणी कार्यालयात होणारी सुनावणी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर गेली आहे. आता ही सुनावणी १७ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता होणार आहे.
एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांची महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत असलेल्या जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे खोटे जात प्रमाणपत्र असल्याची तक्रार एका तक्रारदारकाडून करण्यात आली आहे. यासंदर्भात नोव्हेंबर महिन्यात तक्रारदाराला समितीने कागदपत्रे घेऊन कार्यालयात बोलविले होते. त्यानुसार, तक्रारदार अशोक कांबळे यांचे वकील हे कागदपत्रे घेऊन कार्यालयात पोहोचले होते. तक्रारदाराने कागदपत्र सादर केली, त्यानुसार प्रथम दर्शनीय समितीने या तक्रारीची गंभीर दखल घेत तक्रारदार व समीर वानखेडे या दोघांनाही पुढील चौकशीसाठी बोलावले होते.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे समीर वानखेडे यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसून आले. समीर वानखेडे हे भ्रष्टाचारी आणि खंडणीखोर अधिकारी असून त्यांनी अनेक निर्दोष लोकांना खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवल्याचा नवाब मलिक यांचा दावा आहे. तसेच, समीर वानखेडे हे जन्माने मुस्लीम आहेत आणि त्यांनी बोगस जात प्रमाणपत्र सादर करून मागासवर्गीयांच्या आरक्षणात घुसखोरी केली व सरकारी नोकरी मिळवली, असाही दावा नवाब मलिक यांनी केला आहे.