नेहमीप्रमाणेच आम्ही खांद्यावर शबनम आणि पायात चपला अडकवून पत्रकार संघाचे ऑफिस गाठले. आम्ही मुक्त ( मोकाट नव्हे !) पत्रकार असल्यामुळे आमचे ठराविक वेळापत्रक नसते , पण सर्व पेपर्स फुकटात वाचण्यासाठी आणि आमच्या जातिबांधवांकडून मिळणारी खबरबात ऐकण्यासाठी रोज सकाळी आमचा पत्रकार संघाच्या ऑफिसमध्ये फेरा असतोच असतो. आजही नेहमीप्रमाणे सगळी पेपर्स नजरे खालून घालतांना एका जाहिरातीवर आमची नजर खिळली. नुसतीच खिळली नाही तर चमकली सुद्धा ! ‘ संपादक पाहिजे’ अशी जाहिरात पाहून आमच्या भविष्याबद्दलच्या आशा पल्लवित झाल्या. आम्ही तडक त्या वर्तमानपत्राचे ऑफिस गाठले.
कार्यालयातल्या शिपाई कम कारकूनाकडे ( तोच कारकून सुद्धा होता, हे नंतर कळलं !) चौकशी केली असता त्याने हातात एक कागद कोंबला आणि ‘ हे वाचा.’ एवढंच बोलून तो कुठेतरी निघून गेला. आपण आपल्याच वर्तमानपत्राच्या भावी संपादकाला निदान बसण्यासाठी तरी सांगावे , नाही चहाला पण निदान पाण्याला तरी विचारावे असेही त्याला वाटले नाही. आम्ही कोपऱ्यातल्या खुर्चीवर बसून , त्याने आमच्या हातात कोंबलेला कागद वाचू लागलो. ‘ सर्व इच्छुकांनी मुलाखतीसाठी येतांना त्यांनी आतापर्यंत केलेल्या पत्रकारितेचा लेखी पुरावा सोबत आणावा. सर्व उमेदवारांनी आपली सध्याची ‘ पे स्लिप’ सोबत आणावी. निवड झालेल्या उमेदवारास त्याच्या सध्याच्या ‘ पे स्लिप’पेक्षा दुप्पट पगार दिला जाईल. ( हा प्रकार म्हणजे रात्रीतून पैसे डबल करून देतो असं सांगून गंडवणाऱ्या बाबा सारखा होता, हे नंतर कळलं ! )) सध्याच्या ठिकाणी बिनपगारी असल्यास व उमेदवार अविवाहित असल्यास आमच्याकडून रेस्ट हाऊसमध्ये राहण्याची व जेवणाच्या डब्याची सोय करण्यात येईल. पहिला पगार मिळाला की ही सोय बंद करण्यात येईल. उद्या सकाळी ठीक अकरा वाजता मुलाखतीसाठी हजर राहावे.’
दुसऱ्या दिवशी बरोब्बर अकराच्या ठोक्याला आम्ही मुलाखतीसाठी हजर झालो. आमची जुजबी चौकशी केल्यावर आम्हाला वेटिंग रुममध्ये बसविण्यात आलं. मुलाखत केव्हा होईल असं विचारल्यावर , ‘ छोटया मालकांनी सकाळी एका सायबाला चिकलाने आंगोळ घातली , तवा तेंच्या अंगावर बी थोडा चिक्कल उडाला. घरी आंगोळीला गेले हायेत. ईतील जरा टायमानं.’ अशी माहिती देण्यात आली. दरम्यानच्या काळात पिण्यासाठी पाणी मागून घ्यावे लागले. थोड्याच वेळात छोटया मालकांनी आत बोलावल्याचे सांगण्यात आले.
आम्ही दबकत दबकतच आत प्रवेश केला. समोरच्या टेबलवर कुंडल्यांचा भला मोठा गठ्ठा ठेवला होता.छोटया मालकांना नमस्कार करून त्यांच्या समोर आमची कागदपत्रांची फाईल ठेवली. आमच्या फाईलकडे ढुंकूनही न बघता त्यांनी आम्हाला बसण्याचा इशारा केला. त्यांच्या समोर खुर्चीवर बसावे की खाली सतरंजीवरच बसून घ्यावे याचा विचार करत आम्ही उभे असतानाच त्यांनी समोरच्या खुर्चीकडे बोट दाखविले. आम्ही साधारणपणे त्यांचा हात आमच्यापर्यंत पोहचणार नाही इतकी खुर्ची मागे सरकवत तिच्यावर बसलो.
आम्ही – नमस्कार सर.
छो.मा. – ( डाफरत ) ए, सर बीर नाही बोलायचं. मी काही मास्तर नाही. साहेब बोलायचं. समजलं ?
आम्ही – हो साहेब.
छो.मा. – किती वर्ष पत्रकारिता करतोस रे ?
आम्ही – गेली तीस वर्ष करतोय साहेब.
छो.मा. – ( रोखून पाहत ) कुंडलीचा अभ्यास केला आहे का ?
आम्ही – ( दचकून ) काय ?
छो.मा. – अरे , कुंडलीचा अभ्यास केला आहे का ?
आम्ही – ( घाबरत घाबरत) नाही , पण संपादक आणि कुंडलीचा अभ्यास ?
छो. मा. – ( टेबलावरच्या कुंडलीच्या गठ्ठयाकडे बोट दाखवत ) या आमच्या विरोधकांच्या कुंडल्या आहेत. त्या छापायच्या आहेत आपल्याला, समजलं ?
आम्ही – हो साहेब, छापून टाकू.
छो.मा. – झणझणीत अग्रलेख लिहिता येतो का ?
आम्ही – हो साहेब, सध्या दोन दैनिकांचे अग्रलेख मीच लिहितो.
छो.मा. – समजा, आजच्या अग्रलेखात एकाला शिव्याशाप द्यायचे आहेत आणि उद्या त्याचीच स्तुती करायची असेल तर कसं लिहशील ?
आम्ही – सोप्प आहे साहेब. आजचा अग्रलेख असेल, ‘ त्यांच्या हातात बेडया पडो.’ आणि उद्याचा ‘ त्यांच्या तोंडात साखर पडो !’
छो.मा. – (आनंदाने ओरडत ) सापडला ! परफेक्ट माणूस सापडला !! यु आर सिलेक्टेड !!!