बंगळुरू: सीडीएस जनरल बिपीन रावत यांना घेऊन प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातातून बचावलेले एकमेव अधिकारी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचं उपचारादरम्यान निधन झालं आहे. गेल्या बुधवारी (८ डिसेंबर) हवाई दलाच्या चॉपरला अपघात झाला. त्यामध्ये एकूण १४ जण होते. त्यातील १३ जणांचा त्याच दिवशी मृत्यू झाला. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह अपघातात जखमी झाले. त्यांच्यावर बंगळुरूतील कमांड रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र मृत्यूसोबतची त्यांची झुंज अपयशी ठरली. भारतीय हवाई दलानं ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे.
तमिळनाडूतील कुन्नरहून वेलिंग्टनला जात असलेल्या सीडीएस बिपीन रावत यांच्या चॉपरला अपघात झाला. अपघातावेळी चॉपरमध्ये १४ जण होते. त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला. वरुण सिंह अपघातातून बचावले. मात्र ते गंभीर जखमी होते. गेल्या गुरुवारी त्यांना उपचारांसाठी वेलिंग्टनहून बंगळुरूत हलवण्यात आलं. आठवडाभर ते मृत्यूशी झुंज होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. आज रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ‘ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांनी अभिमानानं, शौर्यानं देशची सेवा केली. त्यांच्या निधनानं अतिशय दु:खी झालो आहे. त्यांनी देशाची केलेली सेवा कधीच विसरू शकणार नाही. त्यांचं कुटुंब आणि मित्रांसोबत माझ्या सहवेदना आहेत,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे.