Top Newsफोकस

‘हिट अँड रन’मधील बळींच्या कुटुंबियांना आता आठपट अधिक नुकसान भरपाई !

नवी दिल्ली : देशभरात रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसागणिक वाढतेच आहे. यातही जीवघेण्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. रस्त्यावर बेदरकारपणे गाडी चालवून पादचाऱ्याला धडक देऊन पळून जाण्याचे प्रकारही सातत्याने वाढत आहे. अशा अपघातात निरपराधी पादचाऱ्यांचे हकनाक बळी जात आहेत, मोठ्या प्रमाणावर लोक जखमी होत आहेत. अपघातातील मृत्यू पडणाऱ्या पादचाऱ्यांचे कुटुंबीय किंवा गंभीर जखमींना पुरेशी आर्थिक मदत मिळत नाही. या वस्तुस्थितीची गंभीर दखल घेत केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता हिट अँड रन प्रकरणात मृत्युमुखी पडणाऱ्या रहिवाशांच्या कुटुंबियांना ८ पट अधिक भरपाई दिली जाणार आहे. अर्थात या भरपाईची रक्कम आता २ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. अपघातातील गंभीर जखमी झालेल्यांना १२,५०० ऐवजी ५० हजार रुपये नुकसानभरपाई दिली जाणार आहे.

नवी योजना १ एप्रिलपासून लागू

केंद्र सरकारच्या नव्या योजनेचे नाव ‘हिट अँड रन मोटर अपघातातील बळींची भरपाई योजना, २०२२’ असे असणार असून ही योजना १ एप्रिल २०२२ पासून लागू होणार आहे. मंत्रालयाकडून २५ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘हिट अँड रन’ रस्ते अपघातातील पीडितांना भरपाई देण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम वाढवण्यात आली आहे. गंभीर जखमींसाठी भरपाईची रक्कम वाढवून ५०,००० रुपये करण्यात आली आहे, तर मृत्यूच्या बाबतीत सध्याच्या २५,०० रुपयांवरून २,००,००० लाख रुपये अशी भरपाईची रक्कम वाढवण्यात आली आहे. १ एप्रिल २०२२ पासून ही नवी योजना जुन्या ‘भरपाई योजना, १९८९ ची जागा घेईल. नुकसान भरपाईसाठी अर्ज करण्यासाठी व पीडितांना पैसे देण्यासाठीही मुदत निश्चित करण्यात आली आहे.

मोटार वाहन अपघात कायदा निधीशी संबंधित नियमही निश्चित

केंद्रीय मंत्रालयाने मोटार वाहन अपघात कायदा निधीशी संबंधित नियमही निश्चित केले आहेत. या निधीतून हिट अँड रन अपघातातील जखमींना उपचारासाठी तसेच इतर मदत केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत रस्ते अपघातांची सखोल चौकशी करण्याची प्रक्रिया असणार आहे. अपघातांचा तपशीलवार अहवाल आणि दाव्यांचा जलद निपटारा यासाठीही तरतूद आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button