Top Newsराजकारण

मी प्रचंड राष्ट्रवादी; माझा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर नाही तर शिवसेनेच्या प्रसारावर !

संजय राऊतांचे नारायण राणेंना चोख प्रत्युत्तर; मिलिंद नार्वेकरांकडूनही राणेंची पोलखोल !

मुंबई : काही वेळापूर्वीच केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणेंची ताबडतोब पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी संजय राऊतांची कुंडलीच माडल्याचा दावा केला. संजय राऊत हे बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी अत्यंत घाणेरडे बोलले आहेत. बाळासाहेबांनी इशारा केला असता तर संजय राऊत राहिलेही नसते. अशी घणाघाती टीका केली. तसेच संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आहे. यांनी राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे. संजय राऊत पूर्ण राष्ट्रवीदचे आहेत. असा आरोप राणेंनी केला आहे. त्याला आता संजय राऊतांनीही लगेच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. होय मी राष्ट्रवादी आहे, मी प्रचंड राष्ट्रवादी आहे. माझा डोळा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर नाही तर शिवसेनेच्या प्रसारावर आहे. शिवसेनेचा प्रसार जोरात होत आहे. येत्या लोकसभेपर्यंत शिवसेनेचा एवढा विस्तार होईल की शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचेल, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

एवढच नाही तर २०२४ च्या निवडणुकीनंतर भाजपमधील अनेकजण बरोजगार झालेले असतील, असा टोलाही राणेंना राऊतांनी लगावला आहे. तर राणेंवर कोकणातल्या दुसऱ्या राऊतांनीही जोरदार प्रहार चढवला आहे. नारायण राणेंची पत्रकार परिषद संपल्या संपल्या शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राणेंचा समाचार घेतलाय. त्यांनी नारायण राणे यांनी मोदी आणि भाजपवर टीका केल्याच्या व्हिडिओंची मालिकाच मीडियासमोर मांडली आहे. फक्त नारायण राणेच नाही तर त्यांनी नितेश राणे यांचाही समाचार घेतला आहे. नितेश राणे यांनी आरएसएसवर केलेली टीकाही त्यांनी दाखवली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ पॅटर्न सक्रिय झाला आहे.

विनायक राऊत फक्त राणेंवर बोलून थांबले नाहीत तर त्यांनी किरीट सोमय्या यांचाही समाचार घेतला आहे. किरीट सोमय्या यांनी राणेंवर केलेले भ्रष्टाचाराचे आरोपही व्हिडिओच्या माध्यामातून विनायक राऊत यांनी दाखवले आहेत. राणेंवर आरोप झाल्यानंतर राणे चोर दाराने पळून दिल्लीला गेले. आणि दिल्लीत जाऊन भाजपच्या बड्या नेत्यांचे पाय धरले असा घणाघात त्यांनी केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा दाखल देत शिवसेनेने नारायण राणे यांना मुख्यमंत्री केले असले तरी त्यांना कधीही बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा नेता म्हटले नाही असे सांगत नेता होण्याची त्यांची लायकी नाही म्हणत पत्रकार परिषदेत राणे कुंटुंबीयांवर टीका केली आहे. त्यामुळे राज्यात सध्या पत्राकर परिषदांचा सपाटा दिसून येत आहे.

मिलिंद नार्वेकरांकडूनही नारायण राणेंची पोलखोल !

पत्रकारांनी संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेतील शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांच्या अनुपस्थितीबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राणेंनी मिलिंद नार्वेकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मिलिंद नार्वेकर हे मातोश्रीवर बॉयचं काम करत होते, असा खुलासाच राणेंनी केला. राणेंच्या या खोचक टीकेला आता मिलिंद नार्वेकर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मिलिंद नार्वेकरांनी राणेंना त्यांच्या मेडिकल कॉलेजच्या परवानगीबाबत किती वेळा फोन केला होता याची आठवणच करुन दिलीय.

संजय राऊत यांच्या मंगळवारच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, एकनाथ शिंदे हे नेते उपस्थित नव्हते. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता, कोण ओ मिलिंद नार्वेकर? पूर्वी मातोश्रीमध्ये बॉयचं काम करायचे ते काय? हो… माझ्यासमोरची गोष्ट आहे ओ. मी पाहिलं आहे, बेल मारली की येस सर… काय आणू? असं म्हणणारा आता नेता बनला. काय अपग्रेडेशन स्पीड आहे ओ, अशा शब्दात राणेंनी मिलिंद नार्वेकरांची खिल्ली उडवली.

राणेंच्या या टीकेला आता मिलिंद नार्वेकर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट करुन राणेंना आपल्या मेडिकल कॉलेजच्या परवानगीसाठी किती वेळा फोन केले, याची आठवणच करुन दिली आहे. ‘बॉय का? अच्छा! स्वत:च्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करुन विनंत्या केल्याचं विसरलात? वाजला का नाही तुमच्या मेमरीची घंटी?’ असा खोचक सवाल नार्वेकर यांनी राणेंना केलाय.

दरम्यान, मिलिंद नार्वेकर शिवसेना सचिव पदापर्यंत कसे पोहोचले याची उत्सुकता अनेकांना आहे. मात्र, याचं उत्तर खुद्द मिलिंद नार्वेकरांनीच एक ट्विटद्वारे दिलं होतं. २६ जुलै अर्थात उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला मिलिंद नार्वेकरांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटो ट्वीट करुन आपल्या शिवसेना प्रवेशाची माहिती दिली होती. ‘सप्टेंबर १९९४ चा नेहमीसारखाच एक दिवस… एक तरुण उद्धवसाहेब ठाकरे यांना भेटला. म्हणाला मला शाखप्रमुख बनायचं आहे. साहेब म्हणाले, “शाखाप्रमुख बनायचं आहे की पक्ष देईल ती जबाबदारी घ्यायची आहे?” उद्धवसाहेबांचा शब्द प्रमाण मानून ते देतील ती जबाबदारी घेण्यासाठी तो तरुण तयार झाला. तेव्हापासून उद्धवसाहेबांनी मार्गदर्शन करत, नवे विचार देत, कौतुकाचे बोल आणि प्रसंगी कानउघडणी करत त्या तरुणाप्रमाणे अनेकांच्या आयुष्याला सुयोग्य दिशा दिली. आमच्या या मार्गदर्शकाला, प्रेरणा स्थानाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा’, असं ट्वीट मिलिंद नार्वेकर यांनी केलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button