
पुणे : राज्यात महापालिका निवडणुका न घेता त्याठिकाणी प्रशासक नेमून महापालिकांचा कारभार देखील आपल्या ताब्यात ठेवण्याचा कट सरकार आखत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी आणि रणनिती आखण्यासाठी राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. आज ते पुण्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्याआधी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले.
राज्य सरकारलाच निवणुका नको आहेत. निवडणूक घेण्याची सरकारचीच इच्छा नाही. याकडे आपण गांभीर्यानं पाहायला हवं. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन निवडणुका लांबणीवर टाकण्याचा राज्य सरकारचा घाट सुरू आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
कोरोना आणि ओबीसी आरक्षणाचं कारण देऊन निवडणुका लांबणीवर टाकायच्या. त्यानंतर महापालिकांवर राज्य सरकारकडून प्रशासक नेमून आपल्याच हातात महापालिका प्रशासन ठेवण्याचा सरकारचा इरादा आहे. खरंतर राज्य सरकारकडे पुरेशी यंत्रणा आहे. ठरवलं तर ओबीसी जनगणना केली जाऊ शकते, असं राज ठाकरे म्हणाले.
ओबीसी आरक्षण नसल्यामुळे निवडणुका स्थगित करण्याच्या निर्णयाला काहीच हरकत नाही. पण यामागे सरकारचं काही काळंबेरं असेल आणि आरक्षणाच्या मुद्द्याच्या आडून सरकार महापालिकांवर प्रशासक नेमून कारभार आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा विचार आपण करायला हवा, असं राज ठाकरे म्हणाले. ओबीसींची जनगणना करुन निवडणूक घेण्यास काहीच हरकत नाही, असंही ते म्हणाले.
फक्त गणेशोत्सवालाच गर्दी नको, ही कोणती पद्धत?
तुमच्या राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांना गर्दी चालते. फक्त दहीहंडी आणि गणेशोत्सवालाच गर्दी नको, ही कोणती पद्धत? असा सवाल राज ठाकरे यांनी आघाडी सरकारला केला आहे. सरकारचे त्या त्या पक्षाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. तिकडे गर्दी चालते. फक्त दहीहंडी आणि गणेशोत्सवाला गर्दी चालत नाही. नियम असेल तर तो सर्वांना सारखा हवा. तुमच्या पक्षांच्या कार्यक्रमाला गर्दी चालणार. फक्त गणेशोत्सवाला नको. ही कोणती पद्धत?, असा सवाल करतानाच गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे मंडळं ठरवतील. गणेशोत्सव मंडळांशी बोलून चर्चा करू, असं राज म्हणाले.
तरच शाळा सुरू करा
यावेळी त्यांनी शाळा सुरू करण्याबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. मुलांचं लसीकरण झालं नाही. पुनावालांचंही स्टेटमेंट आहे. पण लसीकरण पूर्ण झालं नसेल तर शाळा कशा उघडणार? लसीकरण झाल्यावरच शाळा उघडा, असंही ते म्हणाले.
हे कुठपर्यंत चालणार?
या लॉकडाऊनमुळे जे चाललं ते बरं चाललं असं सर्व सरकारला वाटतंय. आंदोलने नाही, मोर्चे नाही, सरकारच्या विरोधात कोणी बोलायचे नाही, रस्त्यावर कुणी उतरायचे नाही. काही झंझटच नाही. आपले आपले पैसे कमवा, आपली आपली दुकाने चालवा. बरं चाललंय सरकारांचं. केवळ कोरोनाची भीती दाखवली जात आहे. तिसरी चौथ्या लाटेची भीती दाखवली जात आहे. भीती दाखवून सरकार सर्व करत असेल तर हे कुठपर्यंत चालणार?, असा सवालही त्यांनी केला.