
कोलकाता: कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज मोठा निर्णय जाहीर केला आहे. ममता बॅनर्जी यांनी संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये १५ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. १६ मे रोजी पहाटे ६ वाजल्यापासून ते ३० मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. ममता बॅनर्जी यांच्या धाकट्या भावाचं कोरोनाने निधन झालं. त्यानंतर बंगालमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
राज्याचे मुख्यसचिव आलापन बंधोपाध्याय यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. अत्यावश्यक सेवांशिवाय राज्यात काहीच सुरू राहणार नाही. तसेच अत्यावश्यक सेवेशी संबंधित लोकांनाच प्रवासाची मुभा असणार आहे. तसेच लग्नामध्ये केवळ ५० लोकच सहभागी होऊ शकतील. तर अंत्यसंस्कारासाठी केवळ २० लोकच उपस्थित राहतील, असं मुख्य सचिवांनी स्पष्ट केलं आहे.
लॉकडाऊनचं सक्तीचं पालन करणं बंधनकारक आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. सोशल डिस्टन्सिंगचं पालन आणि तोंडाला मास्क लावणंही बंधनकारक आहे, असंही त्यांनी सांगितलं. लॉकडाऊनचं उल्लंघन केल्यास महामारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी सांगितलं.
काय बंद राहणार : सर्व शिक्षण संस्था बंद राहणार. सर्व सरकारी कार्यालये बंद राहणार. केवळ आवश्यक सरकारी कार्यालयेच सुरू राहतील. सर्व खासगी कार्यालये बंद राहणार. वर्क फ्रॉम होमला परवानगी. सर्व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बार, जिम आणि मनोरंजनाशी संबंधित स्थळे बंद राहतील. शॉपिंग मॉल, रेस्टॉरंट, स्विमिंग पूल, सिनेमा हॉलही बंद राहणार. बस, मेट्रो सर्व बंद राहणार. आंतरराज्यीय बससेवाही बंद राहणार. राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी राहील. मेडिकलशी संबंधित उद्योग सोडून सर्व उद्योग बंद राहील. रात्री ९ नंतर आपत्कालीन सेवा वगळता सर्व बंद राहील
काय सुरू राहणार : सकाळी ७ वाजल्यापासून ते १० वाजेपर्यंत किराणा दुकान आणि किरकोळ व्यापारी दुकाने सुरू राहतील. मिठाई आणि मटनाचे दुकान सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील. चहाच्या मळ्यांमध्ये ५० टक्के सूट राहील. ३० टक्के उपस्थितीत चहाच्या मळ्यांमध्ये काम सुरू राहील.
ई-कॉमर्स सेवा सुरू राहील. एटीएम आणि बँका सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. विवाहात केवळ ५० तर अंत्यसंस्काराला २० लोकांच्या उपस्थितीला परवानगी. ऑप्टिकल दुकाने सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार.
मुख्यमंत्र्यांच्या भावाचं निधन
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे छोटे बंधू असीम बॅनर्जी यांचा आज सकाळी कोरोनाने मृत्यू झाला. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना कोलकाताच्या मेडिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. असीम यांना कोरोना झाल्यानंतर त्यांना मेडिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या एक महिन्यांपासून ते रुग्णालयात दाखल होते. त्यांची ऑक्सिजन लेव्हलही कमी झाली होटी. आज सकाळीच कोरोना नियमांचं पालन करत निमाताला स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. असीम हे कालीघाट येथे राहत होते.




