Top Newsराजकारण

उत्पल पर्रिकरांचा भाजपने केलेला अपमान गोवेकर विसरणार नाहीत : संजय राऊत

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. उत्पल पर्रिकर यांच्या बंडखोरीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपने उत्पल पर्रिकर यांना तिकीट नाकारून त्यांचा अपमान केला आहे. भाजपने उत्पल पर्रिकर यांचा केलेला हा अपमान गोवेकर विसरणार नाहीत, या शब्दांत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

पणजीत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली. उत्पल पर्रिकर यांची वेदना समजून घेऊ शकतो. ज्या पक्षात त्यांचा जन्म झाला, तो पक्ष सोडताना किंवा त्या पक्षापासून दूर जाताना कशा वेदना होतात, हे त्यांच्या चेहऱ्यावर अनुभवलेले आहे. नक्कीच आमच्या सगळ्यांच्या त्याना शुभेच्छा आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

उत्पल पर्रिकर हे अपक्ष लढतायत ही चांगली गोष्ट आहे. भाजपने हे त्यांच्यावर थोपवले आहे. मनोहर पर्रिकर हे गोव्याचे एक असे नेते होते, ज्यांनी गोव्याचे नाव देशभरात उंचावले होते. राजकीय चारित्र्य कसे असले पाहिजे हे त्यांनी दाखवून दिले होतं. परंतु त्यांच्या मुलाला ज्या पद्धतीने गोव्यात, देशाच्या राजकारणात अपमानित केले गेले. हे गोवाच्या जनतेला पटलेले नाही. आता उत्पल पर्रिकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. आता लढाई होईल बेईमान विरुद्ध चारित्र्य. उत्पल यांच्यासमोर पणजीत, भाजपने अशा व्यक्तीला उमेदवार बनवले आहे, ज्याच्यावर भ्रष्टाचार, माफियागिरी, बलात्कार, असे सगळेच आरोप त्याच्यावर आहेत. आश्चर्याची बाब आहे, पंतप्रधान मोदी, अमित शाह येतील प्रचाराला. देवेंद्र फडणवीस तर तिथेच बसलेले आहेत. मग आता उत्पल पर्रिकर आणि हे सगळेजण असा सामना होईल, असे संजय राऊत म्हणाले.

डिपॉझिट गेले तरी आम्ही लढत राहू. बचेंगे तो और भी लढेंगे !

डिपॉझिट गेले तरी आम्ही लढत राहू. बचेंगे तो और भी लढेंगे. भाजपाचे नेते म्हणत आहेत की गोव्यात शिवसेनेचे डिपॉझिट वाचणार नाही. १९८९ पासून भाजप गोव्यात काम करतोय आणि सलग दोन निवडणुकात त्यांचे डिपॉझिट गेले होते. डिपॉझिट गेले म्हणून निवडणुका लढायच्याच नाहीत, असे नाही. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे, पक्षाचा विस्तार करायचा आहे. गोव्या सारख्या राज्यात पक्ष वाढवण्यासाठी अशा निवडणुका लढाव्या लागतात. पण यावेळी तर चित्र वेगळे आहे. डिपॉझिट गेलं तरी आम्ही लढत राहू, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.

गोव्यात शिवसेनेचा पराभव अटळ आहे. शिवसेनेचं तिथे डिपॉझिट जरी वाटलं तरी मी संजय राऊत सांगतील तिथे चहा आणि जेवण देईल, असं ओपन चॅलेंज भाजप नेते अशिष शेलार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना दिलं होतं. त्यावर राऊतांनी पलटवार केला आहे. शेलारांना मी नेहमीच चहा पाजतो, असं सांगतानाच डिपॉझिट जप्त झालं म्हणजे लढूच नये असं नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच मराठा साम्राज्याचा मूलमंत्रही शेलार यांना ऐकवला.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. पानिपतात दत्ताजी शिंदे पडले. घायाळ होऊन पडले. तरीही शेवटपर्यंत म्हणत होते बचेंगे तो और भी लढेंगे. आम्ही लढणारे लोकं आहोत. तुमच्या सारखे भ्रष्ट माफीया व्याभिचारींना तिकीट दिलं असती तर आम्ही कधीच जिंकलो असतो, असा हल्ला राऊत यांनी शेलारांवर चढवला.

राऊत यांनी गोव्यात आघाडी न होऊ शकल्याने स्थानिक काँग्रेस नेत्यांवरही हल्ला चढवला. गोव्यात आघाडी व्हावी म्हणून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशी चर्चा केली. पण राज्यातील नेत्यांच्या आघाडीचे फायदे लक्षात येत नाहीत. आम्ही त्यांना मदत करायला तयार होतो. पण तरीही ते वेगळे लढत आहेत. तुम्ही कोणत्या दुनियेत आहात? कुठून येतो हा कॉन्फिडन्स? आम्हाला हा कॉन्फिडन्स उधार घ्यावा लागेल, असा हल्ला त्यांनी चढवला.

उत्पल पर्रिकरांचे नारायण राणेंना पत्र

भाजपला रामराम केल्यानंतर उत्पल पर्रिकर यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांना पत्र लिहिल्याची माहिती मिळाली आहे. पणजीतून अपक्ष लढण्याची घोषणा केल्यानंतर उत्पल पर्रिकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिले आहे. माझा भाजप सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारावा. आतापर्यंत आपण केलेल्या सहकार्याबद्दल आभार, असे उत्पल पर्रिकर यांनी नारायण राणे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. माझी भूमिका ठाम आहे. मी पणजीतूनच लढणार. दुसऱ्या जागेवरुन लढण्याचा कुठलाही विचार नाही, अशी भूमिका उत्पल पर्रिकरांनी याआधीच मांडली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button