मुंबई : कोरोना विरोधी लसीचे दोन डोस पूर्ण होऊन १५ दिवस झालेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्यासाठी एकदिवसीय तिकीट मिळणार आहे. त्यामुळे आता मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज ३१ ऑक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याआधी लसीकरण करुन १४ पूर्ण झाले असेल तरीही प्रवाशांना मासिक पास किंवा सीझन पास देण्यात येत होता. मात्र आता प्रवाशांना पूर्वी सारखा एकदिवसाचा प्रवास करण्यासाठी तिकीट मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांना लोकलने प्रवास करण्यासाठी एक दिवसाचे तिकीट दिले जावे अशी मागणी करण्यात येत होती.
राज्य सरकारने रेल्वेला काही दिवसांपूर्वी एक पत्र लिहिले होते, ज्यात अत्यावश्यक सेवेतील त्याचप्रमाणे लसीकरण पूर्ण झालेल्या प्रवाशांसाठी तिकीट विक्री बंद करुन त्यांना मासिक पास देण्यात यावेत असे आदेश मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिले होते. लोकल प्रवासावरुन गेली अनेक दिवस प्रचंड गोंधळ सुरू होता. राज्य सरकारच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा रेल्वेला पत्र लिहिले ज्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी त्याचप्रमाणे लसीकरण पूर्ण झालेले नागरिक तसेच महाविद्यालयात जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण (दोन्ही डोस) झाले असेल तर त्यांना एक दिवसाचा प्रवास करण्यासाठी तिकीट देण्यात,अशी विनंती केली होती. त्यानुसार आता लसीकरण पूर्ण (दोन्ही डोस) होऊन १५ दिवस पूर्ण झालेल्या प्रवाशांना लोकल प्रवासासाठी एका दिवसाचे तिकीट मिळणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून लोकलने प्रवास करण्यासाठी पास काढावा लागत होता. रेल्वेच्या या नियमांमुळे लोकलने प्रवास करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. एक दिवस प्रवास करण्यासाठी देखील मासिक पास काढण्याची सक्ती होती. यामुळे अनेकांना लोकलने प्रवास करता येत नव्हता. त्यामुळे राज्य सरकारवर देखील यासंबंधी अनेक वेळा टीका करण्यात येत होती मात्र आता लोकलने प्रवास करण्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
३१ ऑक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर रेल्वेने अतिरिक्त कर्मचारी सेवेत ठेवणे, लोकल प्रवासाचे तिकीट घेणाऱ्या प्रवाशांकडे लसीकरण पूर्ण (दोन्ही डोस) झालेल्या प्रमाणपत्र त्याचप्रमाणे प्रवासी तिकीट घेत आहेत की पास याकडे लक्ष देणे तसेच कोरोनाचे सर्व निर्बंध पाळणे याकडे लक्ष देणे अशा सूचना राज्य सरकारने जारी केलेल्या पत्रात दिल्या आहेत.
दसऱ्याच्या मुहूर्तावर रेल्वेने १८ वर्षांवरील मुलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली होती. राज्य सरकारने दिलेल्या सूचनेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर १८ वर्षांवरील मुलांना लोकल प्रवासासाठी मासिक पास मिळणार आहे. त्यासाठी मुलांकडे आपले ओळखपत्र असणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे ज्या नागरिकांना आरोग्य विषयक समस्या आहेत ज्यामुळे त्यांना कोरोना विरोधी लस घेता येणार नाही त्यांना देखील लोकलने प्रवास करता येणार आहेत त्यासाठी त्यांच्याकडे डॉक्टरांनी दिलेले मेडिकल सर्टीफिकेट असणे आवश्यक आहे