राजकारण

नवी मुंबई विमानतळाला १५ ऑगस्टपर्यंत दि.बा.पाटील यांचं नाव द्या, अन्यथा… : कृती समितीचा अल्टिमेटम

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्यासाठी दि.बा.पाटील कृती समितीनं आज सिडको भवनपर्यंत आंदोलनाचं आयोजन केलं होतं. येत्या १५ ऑगस्टपर्यंत विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव मिळालं नाही तर १६ तारखेपासून विमानतळाचं काम बंद पाडू, अशी घोषणा आंदोलकांनी स्टेजवरुन केली आहे.

या आंदोलनात रायगड, ठाणे, पालघर, कल्याणसह विविध ठिकाणांहून आंदोलक सहभागी झाले होते. यावेळी नवी मुंबईतील आंदोलकांच्या शिष्टमंडळानं सिडको भवनाकडे जात निवेदन दिलं. नवी मुंबईत आज आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सिडको भवनासमोर मोठ्या प्रमाणात बॅरिकेटिंग करण्यात आलं होतं.

आंदोलनात नवी मुंबईसह पनवेल, उरण, कल्याण डोंबिवली, पालघर आदी परिसरातून हजारो आंदोलक सहभागी झाले होते. यावेळी नागरिकांनी दिबांच्या नावाची घोषणा करत राज्य सरकारनं दिबांच्या योगदानाची दखल घेऊन नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचच नाव द्यावं, अशी ठाम मागणी यावेळी केली.

दरम्यान, आंदोलनात भाजपचे आमदार आणि खासदारांसह मनसेचे आमदार राजू पाटील देखील सहभागी झाले होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळ हे मुंबई विमानतळाचाच दुसरा भाग असल्याचं म्हणत त्यासही छत्रपती शिवाजी महाराजांचच नाव देणं जास्त संयुक्तिक राहिल अशी भूमिका घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button