प्रति,
उधोजीराजे बांद्रेकर यांसी, खरं म्हणजे अशा माणसाशी कसं वागावं हेच कळत नाही. तुम्ही असं वागाल अशी अपेक्षा नव्हती. खरं म्हणजे तुमचा परवाचा फोन मी घ्यायलाच नको होता.गोड गोड बोलून माझी दिशाभूल केलीत आणि चुकीच्या गोष्टीसाठी माझा पाठिंबा वदवून घेतलात. माझ्यापेक्षा आमची सौ.च तुम्हाला चांगली ओळखून आहे.आपलं फोनवर बोलणं सुरू असतांनाच ती मला हाताने नको नको असं खुणावत होती,पण मी तिच्याकडे साफ दुर्लक्ष करत, विधानसभेत बोलावं तसं तुमच्याशी बोलतच सुटलो. तुमच्याशी बोलता बोलता मी मनातल्या मनात खातेवाटपसुद्धा करून टाकलं होतं. आता गृहमंत्रीपदाचा अंदाज तुम्हाला बरोब्बर आलेला असल्यामुळे ते तुमच्याच पक्षाकडे ठेवले होते.परिवहनमंत्रीसुद्धा तुमचाच ठेवणार होतो. तुमच्याकडे एकाचवेळी दोन्ही खाती सांभाळणारा माणूस आहे ना , मग म्हटलं असू देत दोन्ही खाती तुमच्याचकडे. वाटा थोडा कमी मिळाला तरी चालेल.उगाच छोट्या छोट्या गोष्टींसाठी किचकीच नको. सर्वनाशे समुत्पन्ने ह्यर्धं त्यजति पण्डितः। अर्धेन कुरुते कार्यम् सर्वनाशो न जायते ॥ काय ? पण शेवटी जेव्हा तुम्ही ३० एप्रिलपर्यंतचा लॉकडाऊन बोललात ना तेव्हा माझे डोळे खाडकन उघडलेत. आणि मी काही बोलण्याआधीच तुम्ही फोन ठेवूनही दिलात. आमच्या सौंं.नी हे सर्व लक्षात आणून दिल्यानंतर तुम्हाला फोन करून तुमची कडक हजेरी घ्यावी म्हणून तुम्हाला परत फोन केला तर तुम्ही माझा नंबर ब्लॉक करून टाकलेला ! सौं.च्या फोनवरून लावला तर तोही ब्लॉक केलेला ! याला रडीचा डाव म्हणतात. राजकारण असं नसतं काही. ही म्हणत होती, ‘वन्स अ चिटर, अल्वेज अ चिटर.’ दीड वर्षांपूर्वी तुम्ही माझ्याशी असंच चिटिंग केलं होतं.
आमच्यावर खंडणीचे संस्कार नाहीत, असं तुमची माणसं तोंड वर करून बोलतात , मग काय हे असे चिटिंगचे संस्कार आहेत का तुमच्यावर ? चिटिंग करणं हा तुमच्या माणसांचा स्थायीभाव दिसतो. मागे तुमच्या पक्षाचा प्रवक्ता असलेल्या त्या वाचाळ संपादकाने माझ्याशी असंच चिटिंग केलं. ‘तुमची ‘मॅरेथॉन मुलाखत’ घ्यायची आहे, प्राथमिक बोलणीसाठी आपण भेटूया.’ असं म्हणून मला एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बोलावलं आणि जेवण झाल्यावर तोंड वेंगाडात ,’ आमचे मालकही कधी फाईव्ह स्टारमध्ये जेवत नाहीत. असं फाईव्ह स्टारमध्ये जेवणाचं बिल ते मंजूर करणार नाहीत. जरा तुम्हीच बघा ना.’ असं बोलून तोंडात बडीशेप खडीसाखरेचा बकाणा भरून ते सरळ बाहेर पडलेत. खिसा मात्र माझा खाली झाला. रात्री सौं.ना हिशोब देता देता नाकी नऊ आलेत ते वेगळे आणि ती ‘मॅरेथॉन मुलाखत’ अजून झालेलीच नाही ! ही काय पद्धत झाली का एखाद्याला गंडवायची ? त्यांच्या अशा वागण्याने तुमची बदनामी होते. पगार वाढवा जरा त्यांचा.
आणि तुम्हाला स्पष्टपणे सांगतो,तुमच्या त्या लॉकडाऊनच्या निर्णयाला माझा अजिबात पाठिंबा नाही. तुमची तिसरी विकेट आठ दिवसांत घेतो की नाही बघा !
– देवानाना नागपूरकर
ता.क. – आता आमची सौ. तुमच्यावर भयंकर संतापली आहे. आता ती लवकरच तुम्हाला उद्देशून शेरोशायरी ट्विट करणार आहे. बँकेत असल्यामुळे ती कोणताच हिशोब अपूर्ण ठेवत नाही. रोजच्या रोज पूर्ण करते. सांभाळा. – दे. ना.
देवानाना नागपूरकर यांसी, आपली गिचिडमीचीड अक्षरांत लिहिलेली चिठ्ठी मिळाली. फार प्रयत्न करून ही वाचता आली नाही. स्वभावचं एक असू देत पण माणसाचं अक्षर तरी निदान चांगलं असावं. हल्ली मी ती करोनाची चेन तोडण्याच्या मिशनमध्ये बिझी असल्यामुळे सहसा अशा चिठ्ठठ्या चपाट्यांकडे लक्ष देत नाही. तितका वेळच नसतो, तुमची आहे म्हटल्यावर पाहिली तरी, पण वाचता आली नाही. हे करोनाचं एकदा आटोपलं की वाचतो वेळ काढून. जमलं तर आमचे संपादक ‘रोखठोक’ उत्तर देतील.
– उधोजीराजे बांद्रेकर