राजकारण

गुलाम नबी आझाद यांचा लवकरच काँग्रेसला रामराम?

आझाद यांच्या निकटवर्तीय २० नेत्यांची काँग्रेसला सोडचिट्ठी

श्रीनगर: गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील नाराजी, धुसपूस आता चव्हाट्यावर यायला लागली आहे. पंजाबमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री असलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत थेट नवीन पक्ष स्थापन केला. यानंतर प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचे राजीनामानाट्य रंगले. पंजाबमधील अंतर्गत वाद शमतोय, तोच आता जम्मू आणि काश्मीरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद पक्षाला सोडचिठ्ठी देऊन नवीन पक्ष स्थापन करणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

गुलाम नबी आझाद काँग्रेसमधील असंतुष्ट जी-२३ गटामधील एक दिग्गज नेते आहेत. जम्मू-काश्मीरमधील पूँछ येथे एका जनसभेला संबोधित करताना २०२४ मध्ये काँग्रेस पक्ष ३०० जागा जिंकताना दिसत नाही, असा दावा केला. दुसरीकडे, आझाद यांच्या जनसभांना होणाऱ्या मोठ्या गर्दीमुळे काँग्रेस पर्यवेक्षक आणि पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी काळात गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन नवा पक्ष स्थापन केल्यास पक्षातील अधिकतर नेते आझाद यांच्यासोबत जातील.

गुलाम नबी आझाद यांच्या जनसभांना होणारी गर्दी वाढत चालली आहे. यामुळे गुलाम नबी आझाद यांचा उत्साह द्विगुणित होत चालला आहे. यातच जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा मिळायला हवा. तसेच विधानसभा निवडणुका व्हायला हव्यात, यासाठीच कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे आझाद यांनी म्हटले आहे. अनुच्छेद ३७० रद्दबाबत होत असलेल्या टीकेला आझाद यांनी उत्तर दिले आहे. तसेच काहींच्या मते अन्य पक्षांतील अनेक नेते आझाद यांच्याशी संपर्कात असून, आझाद यांनी नवीन पक्ष स्थापन केल्यास ते सर्व नेते आझाद यांच्या नव्या पक्षात सहभागी होऊ शकतात, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेस पक्ष आझाद यांचा सन्मान करते

जम्मू काश्मीरमधील या राजकीय चर्चांवर बोलताना काँग्रेस प्रवक्ते रविंदर शर्मा म्हणाले की, संपूर्ण काँग्रेस पक्ष ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा सन्मान करतो. मात्र, पक्षाच्या शिस्तीचे पालन करायला हवे. आझाद यांचे निकटवर्तीय ज्या पद्धतीची विधाने करत आहेत, त्यावरून पक्ष शिस्तीचे ते उल्लंघन करताना दिसतायत, असे शर्मा यांनी म्हटले आहे. दरम्यान, आझाद यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या २० नेत्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button