गांधी घराण्याला ‘घरघर’; ‘यूपीए’च्या नेतृत्वात बदल करण्याची मागणी
अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या नावाची चर्चा
नवी दिल्ली: सध्या सोनिया गांधी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आहेत. सोनिया यांची प्रकृती ठिक नसते. त्यामुळे यूपीए आणि काँग्रेसचं अध्यक्षपद त्यांच्या आरोग्याशी जोडलं गेलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सोनिया गांधी सक्रिय राजकारणात सक्रिय नाहीत. केंद्रातील भाजपच्या विरोधात सक्षम विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. हे सक्षम नेतृत्व देण्यास गांधी कुटुंब अपयशी ठरत असल्याचं या प्रादेशिक पक्षांचं म्हणणं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या हातून यूपीएचं अध्यक्षपद जाणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून संयुक्त पुरोगामी आघाडीचं (यूपीए) अध्यक्षपद राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे देण्याची मागणी होत आहे. शिवसेनेने तर उघडपणे ही मागणी केली आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर ही मागणी जोर धरण्याची अधिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या हातून यूपीएचं अध्यक्षपद जाणार का? यूपीएचं अध्यक्षपद हातून गेल्यास त्याचा थेट गांधी घराण्याच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण होणार का? असा सवालही केला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून गांधी कुटुंबाच्या विरोधात काँग्रेसमधील एक गटच सक्रिय झाला आहे. बहुतेक ज्येष्ठ नेत्यांनी गांधी कुटुंबावर उघड टीका केली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर हा विरोध अधिक वाढताना दिसणार असल्याचं सांगितलं जातं. ओपिनियन पोलनुसार केरळमध्येही काँग्रेसला यश मिळताना दिसत नाही. केरळात डाव्यांचीच सत्ता येणार असल्याचं दिसत आहे. तसं झाल्यास इतिहासात पहिल्यांदा केरळमध्ये एखाद्या आघाडीची दुसऱ्यांदा सत्ता आलेली असेल.
येत्या जूनमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. परंतु काँग्रेसच्या 23 नेत्यांनी थेट गांधी कुटुंबालाच आव्हान दिल्याने यावेळी काँग्रेसचा अध्यक्ष बिनविरोध निवडला जाण्याची शक्यता कमी असल्याचं दिसून येत आहे. यावेळी अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता असून गांधी घराण्यातील उमेदवाराला विजयासाठी संघर्ष करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अन्य मित्र पक्ष रुची घेण्याची शक्यता आहे. गांधी घराण्याला आव्हान देणाऱ्या नेत्याला या मित्र पक्षांकडून पडद्यामागून मदत मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला गांधी घराण्याऐवजी नवं नेतृत्व मिळाल्यास 2024च्या निवडणुकीत भाजपला तगडं आव्हान मिळू शकतं. कदाचित सत्तेत जाण्याचा मार्ग सोपा होऊ शकतो, असं या मित्र पक्षांना वाटत असल्यानेच गांधी घराण्यातील व्यक्ती विरोधात अध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्यांना या पक्षांकडून बळ दिलं जाऊ शकतं, असं सांगण्यात येतं. त्यामुळे गांधी घराण्याच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं राजकीय विश्लेषक सांगतात.
काँग्रेस पक्षाची दिवसेंदिवस लोकप्रियता कमी होत आहे. त्याचा परिणाम केवळ पक्षावरच होत नसून यूपीएवरही होताना दिसत आहे. यूपीएमध्ये सध्या 11 पक्ष आहेत. त्यात नऊ प्रादेशिक पक्षांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन राष्ट्रीय पक्षांचा समावेश आहे. शिवसेनेलाही यूपीएचा हिस्सा मानलं जाऊ शकतं. शिवसेना औपचारिकपणे यूपीएमध्ये सहभागी झालेली नाही. केंद्राच्या सरकारमध्ये आपलं प्रतिनिधीत्व असावं असं सर्व प्रादेशिक पक्षांना वाटत असतं. त्याचाच अर्थ काँग्रेससोबत जुळवून घेण्यात अनेक प्रादेशिक पक्षांना धन्यता वाटत आहे. मात्र, आता काँग्रेसची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. काँग्रेसच्या राजकीय अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांचीही चिंता वाढली आहे. गेल्या 17 वर्षांपासून सोनिया गांधींकडे यूपीएचं अध्यक्षपद आहे. यूपीएच्या अध्यक्ष असतानाच त्यांनी राहुल गांधींकडे काँग्रेसचं अध्यक्षपद सोपवलं होतं.
पवारांकडे नेतृत्व?
यूपीएचं अध्यक्षपद राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. यूपीएमध्ये राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष आहे. यूपीएमध्ये प्राण फुंकण्याची क्षमता केवळ शरद पवारांमध्येच आहे. पवारांना दीर्घ राजकीय अनुभव आहे. सर्व पक्षांमध्ये त्यांचे सलोख्याचे संबंध असून त्यांच्या शब्दाला राजकीय वर्तुळात किंमत आहे. त्यामुळे पवारांकडे यूपीएचं नेतृत्व देण्याची मागणी होत आहे. एनडीएचे मित्र पक्ष भाजपवर नाराज आहेत. तसेच अनेक प्रादेशिक पक्ष एनडीए आणि यूपीएचा भाग नाहीत. अशा वेळी पवारांकडे यूपीएचं अध्यक्षपद गेल्यास हे सर्व प्रादेशिक पक्ष यूपीएमध्ये येऊ शकतात. त्यामुळे 2024च्या लोकसभआ निवडणुकीत भाजप विरोधात सशक्त पर्याय उभा राहू शकतो, त्यामुळेच पवारांकडे यूपीएचे अध्यक्षपद देण्यात यावं असं वाटणारा एक मतप्रवाह आहे.