नाशिकच्या लाचखोर फरार शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांना अटक
नाशिक : आठ लाख रुपयांच्या लाचखोरी प्रकरणात फरार असलेल्या शिक्षणाधिकारी डॉक्टर वैशाली वीर झनकर यांना अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. वैशाली झनकर यांनी शिक्षणसंस्थांच्या शाळांच्या वीस टक्के अनुदानानुसार नियमित वेतन सुरू करण्याकरिता त्यांच्या शासकीय वाहनचालकामार्फत एका शिक्षण संस्थाचालकाकडून आठ लाख रुपयांची लाच स्वीकारली होती. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र त्या एसीबीच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्या होत्या.
सोमवारी नाशिकच्या जिल्हा परिषदेसमोर शिक्षण संस्थाचालकांकडून झनकर यांच्या शासकीय वाहनचालकाने आठ लाख रुपयांची स्वीकारली होती. त्याला एसीबीने ताब्यात घेतले होते. मात्र रात्री सात वाजेनंतर महिला आरोपीला अटक करता येत नाही. या कायद्यातील नियमाचा फायदा घेऊन झनकर यांनी मंगळवारी सकाळी हजर राहू, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला लेखी लिहून दिले होते. मात्र त्यानंतर मंगळवारी सकाळी फरार झाल्या होत्या. या प्रकरणात शासकीय वाहन चालक आणि एका शिक्षकाला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आल्याने दोघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
दरम्यान, वैशाली झनकर यांनी काल नाशिकच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर आज सुनावणी होणार होती. मात्र त्यापूर्वीच ठाणे एसीबीने धडाकेबाज कारवाई करत वैशाली झनकर यांना बेड्या ठोकल्या. ठाणे अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांच्या टीमने वेगाने सूत्रे हलवत वैशाली झनकर यांना अटक करण्यात यश मिळवले.