मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे, असा गौप्यस्फोट राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सक्तवसुली संचालनालयाला दिलेल्या जबाबात केल्याचे समोर आले आहे.
यावरुन आता भाजपने सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. सीताराम कुंटे सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार आहेत. म्हणूनच त्यांचा खुलासा गंभीर ठरतो, असं मत भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी याबाबत ट्विट करुन सरकारवर टीकाही केली आहे.
तसेच, ‘आपल्या माजी मुख्य सचिव आणि विद्यमान प्रधान सल्लागारानेच आपल्या सरकारमधील माजी गृहमंत्र्यांबद्दल एवढी स्फोटक माहिती ईडीसारख्या जबाबदार यंत्रणेला दिली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देणे आता आवश्यक झाले आहे. आपल्या प्रधान सल्लागाराने आपल्याच सरकारमधील एका सहयोगी पक्षाच्या प्रतिष्ठेची लक्तरे अशी जगजाहीर केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माननीय शरद पवार साहेबांना काय उत्तर देतील?’, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला आहे.
ईडीसमोर दिलेल्या जबाबात सीताराम कुंटे यांनी सांगितले की, देशमुख हे गृहमंत्री असताना मला पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे. त्यामध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्याची कुठल्या जागी आणि कोणत्या पदावर बदली करायची, हे नमूद केलेले असायचे. देशमुख यांचा स्वीय सहायक संजीव पालांडे याच्यामार्फत या अनधिकृत याद्या माझ्यापर्यंत पोहोचविल्या जात असत. मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अधीन काम करीत असल्याने संबंधित याद्या स्वीकारण्यास नकार देऊ शकत नव्हतो. देशमुखांकडून आलेली यादी ही पोलीस आस्थापना मंडळाच्या सर्व सदस्यांना दाखविली जात असे. तसेच, ही यादी देशमुख यांच्याकडून आल्याचे मी मंडळाच्या सदस्यांना तोंडी सांगायचो. त्यामुळे पोलिसांच्या बदल्या करताना या नावांचा समावेश केला जायचा, असे कुंटे यांनी ‘ईडी’च्या चौकशीदरम्यान सांगितल्याचे समजते.