नांदेड: शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रामदास कदम यांची ऑडिओ क्लिप खरी की खोटी मला माहीत नाही, पण शिवसेनेत मोठी खदखद आहे हे निश्चित आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. आज ते नांदेडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिपवर प्रतिक्रिया व्यक्त केली. व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप खरी की खोटी यावर मी काही कमेंट करणार नाही. मात्र शिवसेना अंतर्गत मोठी खदखद निश्चित आहे. मी काही त्यांच्या पक्षाचा नेता नाही. त्यामुळे त्या संदर्भात जी काही कारवाई करायची आहे, ते त्यांचा पक्षाचा नेता करेल, असं सांगतानाच शिवसेनेती अनेक नेत्यांशी पदाधिकाऱ्यांनी अनेक वर्षांपासून संबंध आहेत. तिथले अनेक लोक मला भेटत असतात. त्यांच्या मनातलं काय ते सांगत असतात. त्यामुळे शिवसेनेत मोठी खदखद आहे, एवढं मात्र निश्चित, असं फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याला प्रत्यक्ष भरघोस मदत केली पाहिजे. पूरस्थिती असताना विजेचे कनेक्शन कापणेही सुरू आहे. ते बंद केलं पाहिजे. वाळू माफियांमध्ये महसूल आणि राजकीय नेत्यांचे नेक्सस पाहायला मिळत आहे. वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्याला राजकीय आशीर्वाद मिळत आहे, असं त्यांनी सांगितलं. मी अनेक जिल्ह्यांतील वाळू उपसाचा माहिती घेतली आहे. कोर्टाने वाळू उपसा करण्यावर बंधन घातल्यावर यांना दु:ख होत नाही तर आनंदच होतो. कारण त्यांना वाळू उपसा करायला अजूनही एक कुरण चरायला मिळतं. अवैध वाळू उपसा करण्यास पूर्णपणे सरकारी प्रोटेक्शन आहे, असा आरोपही त्यांनी केला.
एनसीबीने आज अंमलीपदार्थ घेणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. त्यावरही फडणवीसांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एनसीबीने जी कारवाई केली आहे. त्यात जर कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
स्वप्न पाहायला हरकत नाही
अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा असं आवाहन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलं होतं. त्यावरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. स्वप्न पाहायला काही हरकत नाही. या तिघांमध्ये समन्वय नाही हे आधीच सांगितलं आहे. त्यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे त्यांच्यात अडचणी निर्माण व्हायच्या. या तीन पायाच्या सरकारमध्ये समन्वयचा अभाव आहेच, पण त्यामुळे जनतेला त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.