Top Newsराजकारण

एकनाथ खडसेंना दणका; ‘ईडी’कडून ५ कोटी ७३ लाखांच्या मालमत्तेवर टाच

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचलनालयानं (ईडी) दणका दिला आहे. ईडीनं एकनाथ खडसे यांची ५ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. लोणावळा आणि जळगाव इथल्या खडसेंच्या मालमत्तांवर ईडीनं टाच आणली आहे. ईडीनं केलेली कारवाई खडसेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

भोसरी एमआयडीसी जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणात माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची सक्तुवसुली संचलनालयानं नोटीस पाठवली होती. गेल्या महिन्यात खडसेंची ९ तास चौकशी करण्यात आली होती. पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड व्यवहार प्रकरणात खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अचक झाल्यानंतर खडसेंची चौकशी करण्यात आली होती. खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीनं समन्स बजावलं होतं. मंदाकिनी खडसे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून १४ दिवसांची मुदत मागितली होती.

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री होते. त्यावेळी त्यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ मध्ये झाला होता. ३१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची केवळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button