Top Newsराजकारण

संजय राऊतांनी शरद पवारांना दिलेल्या खुर्चीवरून भाजपच्या टोल्यांना शिवसेनेचा प्रतिटोला

मुंबई : संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशन काळात निलंबित करण्यात आलेल्या राज्यसभेतील १२ खासदार धरणं आंदोलन करत आहेत. या खासदारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट दिली. त्यावेळी पवार यांना बसण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत खुर्ची देतानाचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोवरुन भाजप नेत्यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर जोरदार टोलेबाजी केलीय. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राऊतांवर निशाणा साधलाय. तसंच राणे बंधुंनीही राऊतांचा खोचक टोले लगावले आहेत. या टोल्यांना शिवसेना नेते उदय सामंत यांनी प्रतिटोला हाणला आहे.

भाजप नेत्यांच्या संजय राऊतांवरील टीकेला शिवसेना नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलंय. संजय राऊतांचा तो फोटो महाराष्ट्रातील राजकीय परंपरेचं प्रदर्शन आहे. एखाद्या देशातील वरिष्ठ नेता जे सर्वांचेच मार्गदर्शक आहेत. ज्यांचा सल्ला, ज्यांचे मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदीही घेतात, अशा व्यक्ती समोर उभी असताना त्यांना खुर्ची देणं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची परंपरा आहे. राऊत साहेबांनी परंपरा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. जे संस्कृती विसरले त्यांनी अशा पद्धतीचे ट्विट करणे योग्य आहे, असं प्रत्युत्तर उदय सामंत यांनी भातखळकर आणि राणे बंधुंना दिलं.

अतुल भातखळकरांचा टोला

‘धरणे आंदोलन करणाऱ्या संसदेतील निलंबित खासदारांना भेटण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार गेले तेव्हा त्यांना खुर्ची देण्यासाठी सुरू असलेली संजय राऊत यांची लगबग पाहा. आम्हाला उगीच वाटत होते की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे राऊतांचे गुरू. पण खरे गुरू शरद पवारच’, असं ट्विट करत भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावलाय.

नितेश राणेंची टीका

आमदार नितेश राणे यांनीही संजय राऊतांवर टीका केलीय. संजय राऊत खुर्ची उचलताना कसलंही आश्चर्य वाटलं नाही. कारण, शिवसेनेची जी अवस्था काँग्रेस आणि राष्ट्रवादीने करुन ठेवली आहे, ती खुर्ची उचलण्यापेक्षा जास्त चांगली नाही. कधी राहुल गांधी, सोनिया गांधी यांना भेटणं, कधी प्रियंका गांधी यांची भेट घेण्यासाठई धावपळ करणं, यापेक्षा संजय राऊत यांनी एकदाच आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करावा. जेणेकरुन यूपीएमध्ये जाण्याचं कष्टही वाचेल, अशी खोचक टीका नितेश राणेंनी केलीय.

निलेश राणेंचं खोचक ट्विट

माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करत ‘पवार साहेबांनी नेमला शिवसेनेचा नवीन कामगार प्रमुख’, असा टोला लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button