स्वातंत्र्य सेनानी, सहकारमहर्षी शिवाजीराव नाडे यांचे निधन
लातूर : सहकारमहर्षी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी शिवाजीराव तुकाराम नाडे उर्फ काकासाहेब (९६, रा. मुरूड) यांचे शुक्रवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी १० वाजता त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
जुन्या पिढीतील शिवाजीराव नाडे ज्येष्ठ नेते होते. लातूर- उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांचे कार्य लोकाभिमुख होते. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष पदाची धुराही त्यांनी सांभाळली होती. मुरूड येथील जनता विद्यामंदीर संस्थेचे ते पदसिद्ध अध्यक्ष होते. मुरूड ग्रामपंचायत त्यांच्या नेतृत्वात बिनविरोध होती. त्यांनी तब्बल ३८ वर्षे सरपंच म्हणून कार्यभार पाहिला होता. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिवाजीराव नाडे यांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले. शिक्षण घेत असताना त्यांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामात सहभाग घेतला होता. निजामाच्या विरोधातील सशस्त्र लढ्यात त्यांचे योगदान होते.
स्वातंत्र्यानंतर त्यांनी बीडचे तत्कालीन खासदार कै. बाबासाहेब परांजपे यांच्या नेतृत्वाखाली मुरूड परिसरात ग्रामविकासाला सुरूवात केली. ग्रामविकासाच्या अनेक योजना त्यांच्या पुढाकाराने राबविल्या गेल्या. खादी उद्योगातून विणकाम, हातकाम, सुतकतई आदी उद्योग सुरू केले होते. १९९२ मध्ये त्यांनी रूरल एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मुरूड सारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. सहकार संस्थेचे जाळेही त्यांनी उभारले. जिल्हा मार्केटिंग संस्थेचे ते अध्यक्ष राहिले. ढोकीचा तेरणा सहकारी साखर कारखाना, लातूरची सात मजली जिल्हा बँक तसेच सहकार तत्वावरील डाल्डा फॅक्टरीच्या स्थापनेत त्यांचा सिहांचा वाटा होता. दूरसंचार, वीज, रेल्वे, वृक्ष लागवड आदी क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य होते. ग्रामविकास संस्था व क्षेत्र विकास समितीची स्थापनाही त्यांच्या नेतृत्वात झाली. १९८० मध्ये लातूर विधानसभा निवडणुकीत ते एस. काँग्रेसचे उमेदवार होते. थोड्या मतांनी त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता.