प्रवीण राऊत यांना ७ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ७ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी देण्यात आल्यामुळे प्रवीण राऊत यांचा जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आणि भूखंड खरेदी प्रकरणात प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली आहे. दरम्यान प्रवीण राऊत यांच्या निकटवर्तीयांवर महाराष्ट्रात काही ठिकाणे ईडीने छापेमारी केली आहे.
प्रवीण राऊत यांना २ फेब्रुवारीला १ हजार ३४ कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्यामध्ये ईडीने अटक केली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांचे प्रवीण राऊत हे निकटवर्तीय आहेत. प्रवीण राऊतांच्या अटकेनंतर संजय राऊतांनी ईडीविरोधात संताप व्यक्त करत गंभीर आरोप केले होते. प्रवीण राऊत यांची ईडी कोठडीतील मुदत संपत असल्यामुळे त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्यांना ७ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
प्रवीण राऊत यांना न्यायालयीन कोठडी मिळाली असून आता ते जामीनासाठी प्रक्रिया करु शकतात. मात्र ज्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. त्या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडून पूर्ण झाले असल्याचे वाटत आहे. परंतु पीएमलए कायद्यांतर्गत प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली असल्यामुळे जामीन मंजूर करण्यामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणात आणि पीएमएलए कायद्यामध्ये जामीन झाला नाही आहे. .
प्रवीण राऊत यांच्या बेनामी मालमत्तेप्रकरणी मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये छापेमारी करण्यात आली आहे. १ हजार कोटी रुपयांमधून मालत्ता खरेदी केली असल्याचा संशय असल्यामुळे ईडीने छापेमारी केली आहे. या छापेमारीमुळे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.