1) दीदींना बंगालच्या स्वप्नांवर लाथ मारू देणार नाही – नरेंद्र मोदी
# हो ना, काळजी तर घ्यायलाच हवी. आधीच तर एक पाय तुटला आहे , आता दुसराही तुटला तर ?
2) ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे कॉल शपथविधीपासूनच रेकॉर्डिंगवर – एक बातमी
# म्हणजे तिकडे बारश्याचा कार्यक्रम सुरू असतांनाच इकडे ‘बाराव्या’ची तयारी सुरू झाली होती म्हणायची !
3) पोलीसदलातील बदल्या म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण -एक बातमी
# बदलतात ते फक्त त्या कुरणात चरणारे पक्षीय घोडे !
4) सखोल चौकशी केली तर फटाक्यांची माळ लागेल – राज ठाकरे
# पहिली काडी लावायची वाट पाहतायं वाटतं ?
5) परमबीरसिंग केंद्राचा ‘बोलका पोपट’ -संजय राऊत
# तुमचा ‘पाळीव कुत्रा’ त्यांचा ‘ बोलका पोपट’ कसा झाला ?
6) अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो – उध्दव ठाकरे
# भाजपला ओळखायला पंचवीस वर्षे लागलीत तर अधिकाऱ्यांना वर्ष दिडवर्षात कसे ओळखणार ? हळूहळू हळूहळू. अजिबात घाई करायची नाही.
7) जी कागदपत्रे मिळवण्यासाठी आम्हाला आटापिटा करावा लागतो ती फडणवीसांना सहजासहजी कशी मिळतात – काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा सवाल
# पारिजात माझ्या अंगणी , फुले का पडती शेजारी ?
8) फोन टॅपिंगसाठीही काही नियम असतात – जितेंद्र आव्हाड
# फक्त कोणाला बंगल्यावर उचलून आणून झोडायला काही नियम नसतात !
9) फडणवीसांनी जाहीर केलेला अहवाल म्हणजे भिजलेला लवंगी फटाका -संजय राऊत
# भिजलेला लवंगी फटाका पाहून पळापळ करणारे किती ‘फुसके’ असतील नाही ?
10) महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याआधी केंद्र सरकार बरखास्त करायला हवं – संजय राऊत
# याला म्हणतात, ‘ उलटा चोर कोतवाल को डाटे !’
11) चौकशी करा. ‘ दूध का दूध पानी का पानी ‘ व्हायला पाहिजे – गृहमंत्री अनिल देशमुख
# हो पण त्यासाठी तुमच्या पाण्यात थेंबभर तरी दूध असायला हवं ना ?
12) मी सत्तेवर असतो तर परमबीरसिंगांना निलंबीतच केले असते – नाना पटोले
# यालाच तर ‘ मुंगेरीलाल के हसीन सपने’ म्हणतात.
13) दोन मई , दीदी गई – पश्चिम बंगालमध्ये भाजपची घोषणा
# आणि दो मई , दीदी वापस आई , असं झालं तर ?
14) पाच वर्षात अमेरिका आणि युरोपपेक्षा पायाभूत सुविधा चांगल्या असतील – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
# बापरे ! पाच वर्षात अमेरिका आणि युरोपचा दर्जा इतका खालावणार आहे ?
15) पुणेकरांना अजित पवारांचा आठ दिवसांचा अल्टीमेटम – एक बातमी
# असा अल्टीमेटम राज ठाकरेंना द्यायची हिम्मत केव्हा दाखवाल ?
16) सध्या युपीए विकलांग अवस्थेत आहे – संजय राऊत
# युपीएची उठाठेव करण्यापेक्षा राऊतांनी काँग्रेस आपल्या सरकारचा ‘टेकू’ तर काढणार नाही ना , याची चिंता करावी . लंगडं करतंय पांगळ्याची उठाठेव !
17) राजकारणात अधिकाऱ्यांवर इतका विश्वास कधीच ठेवायचा नसतो – संजय राऊत
# अब पछताए तो क्या ,जब चिड़िया चुग गई खेत !
18) हे सरकार काँग्रेसच्या ‘टेकू’वर उभे आहे हे संजय राऊतांनी विसरू नये – नाना पटोले
# ‘ नाना म्हणे आता उरलो ‘टेकू’ पुरता !’