माजी खासदार शाहबुद्दीनच्या मृत्यूच्या बातमीने गोंधळात गोंधळ
नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचा माजी खासदार आणि बिहारचा बाहुबली नेता मोहम्मद शाहबुद्दीन तिहार जेलमध्ये हत्या प्रकरणात शिक्षा भोगत आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर मोहम्मद शाहबुद्दीन याला मंगळवारी रात्री दिल्लीतील दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यातच शाहबुद्दीनचं शनिवारी सकाळी निधन झाल्याचं वृत्त ‘एएनआय’च्या हवाल्याने अनेक प्रसारमाध्यमांनी दिलं. मात्र शाहबुद्दीनची प्रकृती गंभीर आहे, मात्र तो जिवंत आहे, असा दावा तिहार तुरुंग प्रशासनाने केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गोष्टी अफवा असल्याचं तिहार तुरुंगाच्या डीजींचं म्हणणं आहे. त्यानंतर एएनआय वृत्तसंस्थेने आधीचेट्विट डिलीट करत सुधारणा केली. राजद प्रवक्ते आणि शाहबुद्दीनच्या कुटुंबीयांनी तशी माहिती दिल्याचं सांगत एएनआयने दिलगिरी व्यक्त केली आहे.
मोहम्मद शाहबुद्दीन याचा मृत्यू झाल्याची अफवा उसळल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. मात्र तिहार जेल प्रशासनाने त्याच्या निधनाच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. मोहम्मद शाहबुद्दीन हा राजद सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांचा निकटवर्तीय मानला जातो. शाहबुद्दीनवर दिल्लीतील दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती गंभीर असून डॉक्टर त्याच्यावर निगराणी ठेवून आहेत, असे सांगितले जात आहे. गँगस्टर ते खासदार असा राजकीय प्रवास असलेला मोहम्मद शाहबुद्दीन सध्या दिल्लीतील तिहार तुरुंगात हत्या प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. शाहबुद्दीन हा बिहारमधील सीवन मतदारसंघातून राजदच्या तिकीटावर लोकसभा खासदार होता. त्याच्याविरोधीत तीन डझनपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. १५ फेब्रुवारी २०१८ रोजी सुप्रीम कोर्टाने त्याला बिहारच्या सीवन तुरुंगातून तिहार तुरुंगात नेण्याचे आदेश दिले होते.
गेल्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात त्याचे पिता शेख मोहमद हसीबुल्लाह यांचं वयाच्या ९० व्या वर्षी निधन झालं होतं. त्यावेळी त्याला पॅरोलवर बाहेर जाण्याची परवानगी मिळाली नव्हती. तिहार तुरुंगातील सेलमध्ये एकट्यालाच कैद केलेला मोहम्मद शाहबुद्दीन हा हायप्रोफाईल कैदी मानला जातो. इतर कैद्यांसोबत तो कमीत कमी काळ संपर्कात येत असे. गेल्या २०-२५ दिवसात तो कुठल्या नातेवाईकालाही भेटला नव्हता.तरीही त्याला कोरोनाची लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच तिहार तुरुंगातील आणखी एक हायप्रोफाईल कैदी आणि गँगस्टर छोटा राजनलाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. छोटा राजनही शाहबुद्दीनप्रमाणेच तिहार तुरुंगातील सेलमध्ये एकटाच कैद होता.