जनता दलाचे माजी आमदार संभाजी पवार यांचे निधन

सांगली : कुस्तीत आणि राजकारणातही प्रतिस्पर्ध्याला धोबीपछाड देण्यात पटाईत असणारे बिजली मल्ल आणि माजी आमदार संभाजी पवार यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. ते अनेक वर्षे जनता दलात होते. याच पक्षाच्या तिकिटावर ते ३ वेळा, तर भाजपच्या तिकिटावर एकदा आमदार झाले.
संभाजी पवार यांना पार्किन्सचा आजार होता. गेल्या वर्षी त्यांना उपचारासाठी मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी उपचारादरम्यान, त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी कोरोना देखील हरवलं होतं. अखेर आज मध्यरात्री त्यांचं निधन झालं. संभाजी पवार सांगली मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.
मल्ल हरी नाना पवार यांचे पुत्र म्हणून संभाजी पवार यांची ओळख होती. कुस्तीच्या आखाड्यात भल्याभल्या मल्लाला अवघ्या काही क्षणात चितपट करून आस्मान दाखवण्यात संभाजी पवार हे तरबेज होते. त्यामुळेच महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, हरियाणा आदी राज्यांमध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग होता. त्यानंतर कुस्तीच्या आखाड्यात हात आजमावून झाल्यानंतर त्यांनी राजकीय आखाड्यात नशीब आजमावून पाहिले. वसंतरावदादा पाटील यांच्या हयातीत त्यांचे पुतणे सहकारमहर्षी विष्णुअण्णा पाटील यांचा सांगली मतदार संघातून विधानसभेला पराभव करून पहिल्यांदा आमदार झाले. त्यावेळी ते जनता दलात होते.
संभाजी पवार यांनी २००९ साली भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या प्रवेशावेळी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संभाजी पवार यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवली होती. 2014 साली पक्षातील स्थानिक नेत्यांशी झालेल्या मतभेदानंतर ते राजकीय दृष्ट्या बाजूला झाले होते. मात्र, तरी सातत्याने विविध प्रश्नांवर ते आपली मते मांडत असत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, बंधू, पुतणे असा मोठा परिवार आहे.