राजकारण

शिवसैनिक संतप्त होताच नितेश राणेंची माघार !

मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविषयी बोलताना भाजप आमदार नितेश राणे यांचा तोल गेला. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर काल भरविण्यात आलेल्या प्रतिविधानसभेत बोलताना ‘आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचे वंशज आहेत का? यासाठी त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल’, असं वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. त्यानंतर मुंबईत संतप्त शिवसैनिकांनी जोरदार राडा केला. त्यानंतर नितेश राणे यांच्याकडून ‘भावना दुखावल्या असल्यास शब्द मागे घेतो’ असं ट्विट करण्यात आले आहे.

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ गोंधळी आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. या निलंबनाच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कोणत्याही कामकाजात भाजप आमदारांनी सहभाग घेतला नाही. विधानसभेच्या पायऱ्यांवर बसूनच भाजप आमदारांनी सरकारविरोधात आपला रोष व्यक्त केला. यावेळी भाजपने प्रतिविधानसभा भरवली होती. इथेच भाषण करत असताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर अत्यंत खालच्या पातळीवर आक्षेपार्ह टीका केली. सरकारवर टीका करताना, सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना नितेश राणे जास्तच आक्रमक झाले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचेच वंशज आहेत का यासाठी त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल, असे आक्षेपार्ह विधान नितेश राणे यांनी केलं होतं.

नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर मुंबईतील शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले. भारतमाता सिनेमासमोर आज सकाळी नितेश राणे यांचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी आंदोलन केलं. यावेळी नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा पुतळा देखील जाळण्यात आला. यादरम्यान पोलीस आणि शिवसेना कार्यकर्ते यांच्यामध्ये झटापट देखील पाहायला मिळाली. आमदार अजय चौधरी यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका करत त्यांनी माफी मागावी आणि इथून पुढे तोंड सांभाळून बोलावं, असं प्रत्युत्तर नितेश राणेंना दिलं. त्यानंतर विधानसभेबाहेर माझ्या कालच्या भाषणामध्ये मी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख केला होता, तो बर्‍याच जणांनी चुकीच्या पद्धतीने घेतला. जर भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द परत घेतो, असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button