राजकारण

विदर्भात भाजपला धक्का; सुनील देशमुख यांची काँग्रेसमध्ये घरवापसी होणार !

नागपूर: राज्याचे माजी अर्थ राज्यमंत्री आणि भाजपचे माजी आमदार सुनील देशमुख हे भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. देशमुख यांनी तसे संकेतही दिल्याने भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तर देशमुख यांच्या पक्षप्रवेशाने विदर्भात ताकद वाढवण्यात काँग्रेसला बळ मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सुनील देशमुख हे काँग्रेसच्या तिकीटावर अमरावती विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने २००९ मध्ये सुनील देशमुख राज्यमंत्री असताना त्यांना थांबायला सांगून तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे सुपुत्र असलेले रावसाहेब शेखावत यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे शहराच्या राजकारणात एक वेगळीच कलाटणी मिळाली होती. प्रतिष्ठेच्या निवडणुकीत राष्ट्रपतीपुत्राने ५ हजार ६१४ मतांनी काँग्रेसला विजय मिळवून दिला होता. त्यावेळी अपक्ष राहिलेल्या देशमुख यांनी नंतर २०१४ निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश करून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवून विजय प्राप्त केला.

सुनील देशमुख हे विदर्भातील मोठे नेते आहेत. त्यांचा विदर्भातील काही पट्ट्यांमध्ये दबदबा आहे. तसेच कुशल संघटक आणि लोकप्रिय नेते म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. भाजपने २०१४ मध्ये भाजपने विदर्भाच्या भरवश्यावर राज्यात सरकार स्थापन केलं होतं. आता विदर्भातील बडे नेतेच पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याने भाजपला विदर्भात मोठा झटका बसला आहे. आगामी काळात विदर्भात पुन्हा काँग्रेसची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच देशमुख यांच्या भाजप प्रवेशाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या १९ जून रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाचं निमित्त साधून मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात देशमुख पक्षप्रवेश करणार आहेत. काँग्रेस हायकमांडनेही या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील दिला आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा काँग्रेस नेते करत आहेत. स्वत: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही त्याचे सुतोवाच केले आहे. स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेसने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यामुळेच पक्षातून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेण्यात येत असून ताकद वाढवण्याचं काम काँग्रेसने सुरू केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button