Top Newsफोकसस्पोर्ट्स

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला अटक, सुटका !

मुंबई : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला रविवारी मुंबई पोलिसांनी अटक केली, पण काही वेळानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. रविवारी दुपारी कांबळीने मुंबईतल्या त्याच्या सोसायटीच्या गेटवर कारला टक्कर मारली, याच आरोपांखाली त्याला अटक करण्यात आली. या घटनेनंतर वॉचमन आणि सोसायटीतल्या काही जणांनी कांबळीसोबत वाद घातला. विनोद कांबळी आणि वाद यांचं नातं तसं जुनंच आहे.

वांद्रे पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार विनोद कांबळीवर भादंविच्या २७९ (जलद ड्रायव्हिंग), ३३६ (दुसऱ्यांचा जीव किंवा वैयक्तिक सुरक्षा धोक्यात टाकणं) आणि ४२७ (नुकसान पोहोचवणं) हे आरोप लावण्यात आले आहेत. ५० वर्षांच्या विनोद कांबळीने क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्डही केले आहेत, तसंच तो सचिन तेंडुलकरचा लहानपणीचा मित्र आहे.

विनोद कांबळी भारताकडून १७ कसोटी सामने खेळला, यात त्याने ५४ च्या सरासरीने १०८४ धावा केल्या आणि ४ शतकं तसंच ३ अर्धशतकंही ठोकली. वन डेमध्ये त्याने ९७ इनिंगमध्ये ३३ च्या सरासरीने २४७७ धावा केल्या, ज्यात २ शतकं आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कांबळीने ३५ शतकांसह ९,९६५ धावा केल्या.

विनोद कांबळी याआधीही वादात सापडला होता. २०१५ साली तो आणि त्याच्या पत्नीवर मोलकरणीचा छळ केल्याचा आरोपही झाला होता. यानंतर दोघांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. काम करणाऱ्या बाईने कामाचे पैसे मागितले म्हणून तिला तीन दिवस खोलीत बंद केल्याचा आरोप दोघांवर होता. पण कांबळी आणि त्याची पत्नी हेविटने मोलकरणीवर ड्रग्ज घेत असल्याचा आरोप केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button