कोल्हापूर: गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका राज्याला बसला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्राचं पावसामुळे मोठं नुकसान झालं. विरोधी पक्षनेते आज कोल्हापुरच्या दौऱ्यावर होते. माजी मुख्यमंत्र्यांनी यावेळी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. या पाहणीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पूरग्रस्तांच्या कर्जमाफीची मागणी केली आहे.
नुकसानीचा आढावा घेण्यासाठी प्रवीण दरेकर आणि मी तीन दिवसांचा दौरा केला. चंद्रकांत पाटीलही आमच्या दौऱ्यात जॉईन झाले. तीन जिल्ह्यात २२ ठिकाणी आम्ही भेट देऊन संवाद साधला. दरड कोसळली, भूस्खलन झालं, घरांमध्ये पाणी गेलं अशा वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. सामान्य माणसांच्या हालअपेष्टा अडचणी समजून घेतल्या, अशी माहिती फडणवीसांनी दिली. तसेच, आम्ही मागच्यावेळी पूरग्रस्त भागाचं कर्ज माफ केलं होतं. तसा निर्णय आता घेण्याची आवश्यकता आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या पूरग्रस्तांना सरकार ५० हजार देणार होतं, पण ही रक्कम अजून दिलेलं नाही. सरकारने ही मदत तातडीने दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
फडणवीस पुढे म्हणाले की, राज्य सरकारकडून तातडीची मदत येणं अपेक्षित होतं, पण अजून पोहोचली नाही. लोक आमच्याजवळ सातत्याने २०१९ च्या मदतीचा उल्लेख करत होते. आमच्या सरकारने ते दिलं होतं. आपत्ती आल्यानंतर एक काळ महत्त्वाचा असतो, ज्यामध्ये रिस्टोरेशन करावं लागतं, त्यावेळी तात्काळ मदत आवश्यक असते. घर-दुकानांमध्ये चिखल घुसतो, ते सफाई करण्यासाठीही खर्च असतो. मिठापासून कपड्यांपर्यंत खराब झाले असतात. अंतर्वस्त्रापर्यंत आणावं लागतं. ही जी तातडीची मदत द्यावी लागते, कारण या पूरग्रस्तांकडे काहीही नसतं. आता उशीर झालाय, पण सरकारने तातडीने मदत करावी, असंही ते म्हणाले.