नवी दिल्ली : भाजप मुख्यालयात कोरोनाचा स्फोट झाला आहे. मुख्यालयातील एकूण ४२ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका होणार होत्या. त्यामुळे भाजपकडून सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली.
दरम्यान, या संदर्भात भाजपकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. भाजप आता आपल्या निवडणूक बैठका कधी आणि कोणत्या पद्धतीने घेणार याबाबतही स्पष्टता नाही. रॅलींवर आधीच बंदी आहे, अनेक नेत्यांना कोरोना लागण झाली आहे, अशा स्थितीत निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आगामी काळात उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा यासह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
गेल्या काही दिवसांत भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरींपर्यंत अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या निवडणूक रॅलींवर बंदी आहे, पण संसर्ग झपाट्याने पसरत आहे. यातच आता भाजप मुख्यालयातही या धोकादायक व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. भाजपा मुख्यालयात संक्रमित व्यक्तींमध्ये सुरक्षा कर्मचारी व अन्य कर्मचारी यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.