राजकारण

परमबीर सिंग यांच्याकडून मुख्यमंत्र्यांसमोर मैत्रीचा प्रस्ताव !

मुंबई : महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची ‘मांड’ सत्तेच्या अश्वावर कायम होत असताना दुसरीकडे मंत्रिमंडळातील ठाकरेंचे काही विजय वडेट्टीवारांसारखे सहकारी स्वैर वर्तन करत आहेत. त्याचवेळी सनदी अधिकारी मात्र मुख्यमंत्री ठाकरेंना मैत्रीचा हात पुढे करण्यात धन्यता मानत आहेत. असाच मैत्रीचा प्रस्ताव मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे.

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना ‘सांभाळून’ घेणार्‍या आणि त्यानंतर ‘रिपब्लिक’ वाहिनीचे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामी यांना अंगावर घेणार्‍या तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना मनसुख हिरेन हत्या, मुकेश अंबानी निवासस्थान स्फोटकं प्रकरणी पायउतार व्हावे लागले. त्यानंतर त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बरोबर उघड पंगा घेतला आणि १०० कोटींचे वसुली प्रकरण न्यायालयात गेल्यावर सरकार आणि परमबीर यांच्यात उभा वाद निर्माण झाला. या आरोप-प्रत्यारोपानंतर माजी आयुक्त परमबीर सिंग यांना राष्ट्रवादीने रडारवर घेतलं. तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात परिवहन मंत्री अनिल परब यांना लपेटून टाकले. पोलीस दलातील महत्वाच्या बदल्या आणि मोठे विषय अनिल परब यांच्या बंगल्यावरच होत होते, असा जबाब दिला. या सगळ्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे परमबीर सिंग यांच्यावर कमालीचे नाराज आहेत. मुख्यमंत्री ठाकरेंची नाराजी दूर करण्यासाठी माजी पोलीस आयुक्तांनी प्रयत्न सुरू केले आहेत. १९८८ च्या बॅचचे परमबीर सिंग यांचे मुंबई महापालिका अति.आयुक्त संजीव जयस्वाल यांचे निकटचे संबंध आहेत.

संजीव जयस्वाल ठाण्यात पालिका आयुक्त असताना परमबीर पोलीस आयुक्त होते. संजीव जयस्वाल यांना प्रशासकीय वर्तुळात परमबीर यांचे ‘छोटे भैया’ म्हणून ओळखले जाते. मुख्यमंत्री ठाकरेंकडे याच ‘छोटे भैया’ करवी परमबीर यांनी मैत्रीचा प्रस्ताव पाठवला आहे. संजीव जयस्वाल हे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय वर्तुळातील समजले जातात. सध्या मुंबई महापालिका कारभार आदित्य ठाकरे पाहत आहेत. ‘आपला शिवसेनेशी किंवा ठाकरेंशी कोणताही वाद नाही. जो काय आपला वाद आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस आणि अनिल देशमुख यांच्याशी आहे. मुख्यमंत्र्यांवरील आपली श्रद्धा आजही कायम आहे. आणि सेनेबाबतचा जिव्हाळाही तसाच आहे,’ असा संदेशच वादग्रस्त आयुक्त परमबीर सिंग यांनी ‘वर्षा’वर पाठवला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्याबाबत केलेल्या समोरच्याच्या चुका विसरतच नाहीत. त्यामुळे ‘चुकीला माफी नाही’ अशीच त्यांची शैली आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री ठाकरे निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या परमबीर सिंग यांना माफ करणार की भाजप बरोबरचा स्नेह वाढवण्यासाठी त्यांचा उपयोग करणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. राज्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र तर दिल्लीतील अनेक भाजप नेत्यांशी परमबीर यांचा स्नेह आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button