नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी पक्षाच्या सर्वच सरचिटणीस, राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य प्रभारींची बैठक बोलावली आहे. २४ जून रोजी व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे ही बैठक होत आहे. पंजाब आणि राजस्थानमधील काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह, आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील सध्याच्या घडामोडींमुळे या बैठकीला अधिक महत्त्व आहे. राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यातील शीतयुद्ध काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहे.
शस्त्रक्रियनंतर सक्रिय झालेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात एक महत्त्वाची होत असून शरद पवारांच्या निवासस्थानीच विरोधी पक्षातील १५ ते २० बड्या नेत्यांची बैठक होणार आहे. या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. त्यातच, आता काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे, देशासह राज्याच्या राजकारणात काहीतरी घडणार, अशी चर्चा जोर धरत आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर टीका केली आहे. त्यातच, शरद पवार यांचा दिल्ली दौराही चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे, सोनिया गांधींनी बोलाविलेल्या बैठकीकडे काँग्रेससह देशातील प्रमुख पक्षांचे लक्ष लागले आहे.