अखेर ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ महाराष्ट्रात दाखल
नागपूर :विशाखापट्टणम स्टील प्लॅट सायडिंगमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या ७ (एलएमओ) टँकर्ससह रो-रो सेवेद्वारे पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस शुक्रवारी रात्री ८ वाजता महाराष्ट्रात पोहोचली. नागपूरमध्ये ऑक्सिजन एक्स्प्रेसमधील ३ टँकर उतरविण्यात आले असून उर्वरित टँकर नाशिक रोड स्थानकात उतरविण्यात येणार आहेत. ऑक्सिजन एक्स्प्रेस शनिवारी सकाळी नाशिक रोड स्टेशनवर पोहोचणार आहे, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
गेल्यावर्षीही लॉकडाऊन काळात रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली होती आणि पुरवठा साखळी कायम ठेवली होती. आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे राष्ट्र सेवेसाठी नेहमीच सज्ज असून ऑक्सिजन एक्स्प्रेस त्याच भावनेतून चालवल्या जात असल्याचेही रेल्वेने नमूद केले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात दाखल झालेली ही पहिलीच ऑक्सिजन एक्स्प्रेस आहे. हा राज्यासाठी खूप मोठा दिलासा आहे. राज्यात कोविड रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना ऑक्सिजनची मागणीही प्रचंड प्रमाणात वाढली आहे. ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावल्याच्या तसेच रुग्णांना अन्य रुग्णालयात हलवावे लागण्याच्या घटना सध्या दररोज घडत आहेत. ही भीषण स्थिती लक्षात घेऊन ऑक्सिजन तुटवडा दूर करण्यासाठी राज्य सरकारचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस दाखल झाल्यानंतर आणखीही ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवण्यासाठी तसेच ऑक्सिजन साठा वाढवण्यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.