आरोग्य

शरद पवारांवर ८-१० दिवसात आणखी एक शस्त्रक्रिया : राजेश टोपे

मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मंगळवारी संध्याकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती उत्तम आहे, असं सांगतानाच येत्या 8 ते 10 दिवसात त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली. शरद पवारांवर काल यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्या पित्ताशय नलिकेत खडे आढळले. त्यामुळे त्यांना पोटदुखीचा त्रास होत होता. मात्र, एन्डोस्कोपीद्वारे हे खडे काढण्यात आले आहेत. आता त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांना आराम वाटत आहे. त्यांचा पोटदुखीचा त्रासही थांबला आहे, असं टोपे यांनी सांगितलं.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पवारांचा गॉल ब्लॅडर काढण्यात येणार आहे. गॉल ब्लॅडर काढल्याने त्यांच्या दैनंदिन कार्यप्रणालीवर काहीही परिणाम होणार नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पोटदुखीचा त्रास वारंवार होऊ नये म्हणून डॉक्टरांनी हा निर्णय घेतला. येत्या 8-10 दिवसांत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून गॉल ब्लॅडर काढण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा अॅडमिट करण्यात येणार आहे. मात्र, त्यांची प्रकृती आणखी उत्तम वाटली तर लगेच चार-पाच दिवसातही त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.

नियम पाळा, लॉकडाऊन टाळा

राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र त्याबाबतची चर्चा झाली आहे. लॉकडाऊन करायचा नसेल तर लोकांनी नियम पाळणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले. नियम पाळा, लॉकडाऊन टाळा हाच एक पर्याय असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात काही ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनाची परिस्थिती अशीच राहिली तर संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लावले जाऊ शकतात, असंही त्यांनी सांगितलं. तसेच राज्यात कुठेही बेड्सची कमतरता नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button