स्पोर्ट्स

अखेर हैदराबादचा यंदाच्या हंगामातील पहिला विजय; पंजाबचा ९ गडी राखून पराभव

चेन्नई : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत पंजाब किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना हैदराबादला विजयासाठी १२१ धावांचे माफक आव्हान दिले होते. हे आव्हान पंजाबच्या फलंदाजांनी १८.४ षटकात ९ गडी राखून पूर्ण केलं आहे. जॉनी बेअरस्टोने संयमी अर्धशतक (६३) झळकावत संघाला आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पहिला विजय मिळवून दिला. बेअरस्टोला कर्णधार डेव्हिड वॉर्नरने चांगली साथ दिली. वॉर्नरने ३७ तर केन विलियमसनने १६ धावांचं योगदान दिलं.

हैदराबादने पंजाबला पराभूत करत या मोसमातील पहिला विजय साकारला आहे. या आधीच्या पहिल्या तिन्ही सामन्यात हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला होता. हैदराबादकडून जॉनी बेयरस्टोने विजयी खेळी साकारली. बेयरस्टोने ५६ चेंडूत ३ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने नाबाद ६३ धावांची शानदार खेळी केली.

हैदराबादच्या शानदार गोलंदाजीपुढे पंजाबचा डाव १२० धावात संपुष्टात आला. पंजाबचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय पंजाबच्या अंगलट आला. पहिल्याच ओव्हरमध्ये राशिद खाने कॅच सोडला. पण त्यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारने राहुलला बाद केले. त्याने चार धावा केल्या. त्यानंतर सातव्या षटकात खलील अहमदने दुसरा सलामीवीर मयांक अग्रवालला २२ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात निकोलस पुरन शून्यावर बाद झाला. यामुळे पंजाबची अवस्था ३ बाद ३९ अशी झाली. मैदानावर असेलल्या ख्रिस गेल आणि दीपक हुड्डा यांच्यावर सर्व मदार असताना राशिद खानने गेलचा अडथळा दूर केला. गेलने १५ धावा केल्या. त्यानंतर अभिषेक शर्माने दीपक हुड्डाला १३ धावांवर माघारी पाठवले. पंजाबचा निम्मा संघ ६३ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता.

या सामन्यात पदार्पण करणारा मोसेस हेनरिक्स १४ वर बाद करत अभिषेकने आणखी एक विकेट घेतली. अखेरच्या काही षटकात शाहरुख खानने धावांचा वेग वाढवला. पण १९व्या षटकात तो २२ धावांवर बाद झाला. पंजाबने २० षटकात १२० धावा केल्या. हैदराबादकडून खलीद अहमदने ३, अभिषेक शर्माने दोन, भुवनेश्वर कुमार आणि राशिद खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button