शेतकरी नेत्याचे हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान
दोघेही काठ्या उचलू, हरलो तर आयुष्यभर गुलामी करेन
चंदीगड: लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचारावरून योगी आणि मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. यातच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरूनही विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. यानंतर खट्टर यांची मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यानंतर एका शेतकरी नेत्याने मुख्यमंत्री खट्टर यांना खुले आव्हान दिले आहे. काठ्यांनी संघर्षाला आम्ही तयार आहोत, या संघर्षात पराभूत झालो, तर तुमची आयुष्यभर गुलामी करेन, असे शेतकरी नेत्याने म्हटले आहे.
दुसरीकडे लखीमपूर खिरी येथील दुर्घटना आणि हिंसाचार प्रक्षोभक वक्तव्यामुळे झाल्याचे म्हटले जात आहे. यानंतरही आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून, सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्षांचे नेते विधानांवर मर्यादा आणत नसल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना काठ्यांचीच भाषा कळते, त्यांना जशास तसे उत्तर द्या, असे खळबळजनक विधान मुख्यमंत्री खट्टर यांनी केले होते. यानंतर आता एका शेतकरी नेत्याने त्यांना खुले आव्हान दिले आहे.
जर हिंमत असेल, तर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी स्वतः पुढे येऊन संघर्ष करावा. दोघेही काठ्या उचलू. या लढाईत पराभूत झालो, तर आयुष्यभर तुमची गुलामी करेन, असे आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री खट्टर यांनी तारीख जाहीर करावी. तुम्ही गुंड तयार करा. आम्ही शेतकऱ्यांना तयार करतो. एका दिवसात काय तो सोक्षमोक्ष लावून टाकू. मात्र, पहिला वार आम्ही करणार नाही. पण आमच्यावर वार केला, तर ते चांगले होणार नाही, असे गुरनाम सिंग चढूनी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, लाठ्या-काठ्या उचला. आक्रमक शेतकऱ्यांना तुम्हीही त्याच भाषेत उत्तर द्या. शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते. प्रत्येक भागात १००, ५०० ते एक हजार कार्यकर्त्यांची फळी उभी करा. तेच शेतकऱ्यांना जशास तसे उत्तर देतील. दोन-चार महिने कारागृहात राहून बाहेर आलात की तुम्हीही नेते व्हाल. जामिनाची काळजी करू नका, असे वादग्रस्त विधान मुख्यमंत्री खट्टर यांनी अलीकडेच केले होते. यानंतर संयुक्त किसान मोर्चा आणि काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी खट्टर यांच्यावर जोरदार निशाणा साधला.