संभाजीराजेंच्या भूमिकेचे भाजपकडून स्वागत; आंदोलनाला पाठिंबा देणार : चंद्रकांत पाटील

मुंबई : मराठा आरक्षणावर खा. संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला ६ जूनपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते. परंतु राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट न केल्यानं येत्या १६ जून रोजी कोल्हापुरातून मराठा मोर्चाला सुरुवात करणार असल्याची घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजेंच्या घोषणेचं स्वागत करत आमचा राजेंच्या आदोलनाला सामान्य नागरिक म्हणून संपूर्ण पाठिंबा असेल असे म्हटले आहे. भाजपचा झेंडा किंवा कार्यकर्ता अशी ओळख न दाखवून सामान्य नागरिकाप्रमाणे पाठीशी राहू असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याचा आजचा दिवस खुप महत्त्वाचा असतो. रायगडावर खूप मोठ्या संख्येने लोकं शिवाजी महाराजांना वंदन करण्यास जात असतात. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणावरुन अल्टिमेटम दिलं होते. परंतु राज्य सरकारने काही केलं नाही. त्यामुळे १६ जूनपासून कोल्हापुरातून मोर्चा काढण्यास सुरुवात करणार अशी घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. संभाजीराजे छत्रपती आमचे नेते आहेत. त्यांच्या घोषणेचे स्वागत करतो असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
भाजपने वारंवार म्हटले आहे की, स्वतःचा झेंडा हाती घेणार नाही रस्त्यावर उतरणार नाही. परंतु जे कोणी मराठा समाजाला लवकर आरक्षण मिळण्यासाठी आणि आरक्षण मिळेपर्यंत सवलती मिळवून देण्यासाठी काम करतील आणि ते राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार जरी असतील तरी त्यांच्या पाठी आम्ही उभे राहणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. संभाजीराजे भाजपचे नेते आहेत, शाहु महाराजांचे वंशज आहेत. पण त्यांना आमचे सहकार्य हवे असल्यास त्यांच्या पाठीशी आहोत असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
भाजप नव्हे, तर मराठा समाजच अशोक चव्हाणांचा राजीनामा मागेल
सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. अशोक चव्हाण समाजाला न्याय देऊ शकत नाही, अशी भावना मराठा समाजात निर्माण झाली असेल तर समाजच त्यांचा राजीनामा मागेल. मी व्यक्तिश: किंवा भाजप अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याची मागणी करणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
त्यांनी ट्विट करून आपली भूमिका मांडली आहे. अशोक चव्हाण मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाहीत, अशी भावना जर मराठा समाजात रुजली असेल तर मराठा समाज त्यांचा राजीनामा मागेल. पण मी व्यक्तिशः व आमचा पक्ष कोणाचाही राजीनामा मागणार नाही. हे सगळे कामकाज त्यांनी नीट सतर्कतेने पाहावे हेच आमचे म्हणणे आहे, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
मराठा आरक्षणासंदर्भातील निकालपत्र अभ्यासण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने एक समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल दिला आहे. पण या समितीने दाखल केलेल्या अहवालात आम्ही वारंवार मांडत असलेले निष्कर्षच अधोरेखित केले आहेत, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले. आम्ही ‘सारथी’ला एक एकर जागा दिली. आता तिथे आम्ही भवन उभारत आहोत, असे अजितदादा सांगत आहेत. पण ती बिल्डिंग बांधायला ५ वर्षे लागतील. अजितदादा, या ५ वर्षांमध्ये भाडे तत्त्वावर एखाद्या जागेत का होईना पण ‘सारथी’चे कामकाज चालवणार आहात की नाही?, असा सवालही त्यांनी केला.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरूनही त्यांनी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना सवाल केले आहेत. ओबीसी समाजाचे सर्वेक्षण होऊन अहवाल यायला किती वेळ लागेल हे मंत्री विजय वडेट्टीवार यांना माहिती आहे का? ओबीसी आरक्षणसंदर्भातील महाविकास आघाडी सरकारच्या कॅज्युअल अॅप्रोचचा आम्ही निषेध करतो, असं त्यांनी म्हटलं आहे.




