फोकसमनोरंजनसाहित्य-कला

प्रसिद्ध व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांचे वृद्धापकाळाने निधन

पुणे : प्रसिद्ध व्हायोलिनवादक आणि संगीतकार प्रभाकर जोग यांचे आज सकाळी पुण्यात त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. प्रभाकर जोगांच्या व्हायोलिन वादनातून जणू शब्द ऐकू येतात, त्यामुळे त्यांचं व्हायोलिने ’गाणारे व्हायोलिन’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी या नावाने अनेक ठिकाणी कार्यक्रमही केले होते. जोग यांच्या निधनाने गाणारे व्हायोलिन अबोल झाले आहे.

संगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक म्हणून तब्बल सहा दशकांहून जास्त वर्षे कार्यरत असलेल्या प्रभाकर जोग यांचे मराठी आणि हिंदी चित्रपट संगीताबरोबरच भावसंगीतातही मोलाचे योगदान आहे. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी पुण्यात वाडय़ांमधून सव्वा रूपया आणि नारळाच्या बिदागीवर व्हायोलिन वादनाच्या कार्यक्रमांना सुरूवात केली. पुढे त्यांनी संगीतकार सुधीर फडके यांचे सहाय्यक म्हणून काम केले. ‘गीतरामायणा’तील गाण्यांना प्रभाकर जोग यांच्या व्हायोलिनचे सूर लाभले आहेत. बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या पाचशे कार्यक्रमांना त्यांनी साथ दिली.

मराठी भावगीत आणि हिंदी गीतांचे त्यांनी व्हायोलिनवर सादरीकरण करून व्हायोलिनला गाते केले. जोग यांच्या व्हायोलिन वादनातून शब्द ऐकू येऊ लागल्याने त्यांचे वादन ‘गाणारे व्हायोलिन’ म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी या नावाने अनेक ठिकाणी कार्यक्रम केले तसेच या ध्वनिफितींना श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आजही अनेक कार्यक्रमांमध्ये तसेच मंगल प्रसंगी गाणार्‍या व्हायोलिनचे स्वर रसिकांच्या कानी पडत असतात.

प्रभाकर जोग यांना मिळालेले पुरस्कार :

– महाराष्ट्र सरकारतर्फे दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार (२०१५)
– कैवारी, चांदणे शिंपीत जा आणि सतीची पुण्याई या चित्रपटांना दिलेल्या संगीताला ’सूरसिंगार पुरस्कार’
– अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने नेत्रदीपक ‘चित्रकर्मी’ पुरस्कार (जुलै २०१७)
– २०१७ सालचा गदिमा पुरस्कार
– पुण्याच्या भारत गायन समाजातर्फे दिला जाणारा वसुंधरा पंडित पुरस्कार (२०१३)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button