आर्यन खान क्रूजवर नव्हताच; नव्या वकिलांचा खळबळजनक दावा
जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब; उद्या निर्णय

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला आजही तुरुंगातच राहावे लागणार. जामीन अर्जांवरील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे. आर्यन खानच्या जामीन अर्जावर उद्या म्हणजेचगुरुवारी निर्णय होणार आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात आज न्यायालयात आपला जबाब दाखल केला आहे. याचबरोबर, एनसीबीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामिनालाही विरोध केला. आर्यन खानकडून भलेही ड्रग्स जप्त केले गेले नसेल, पण त्याच्यासह सर्व आरोपी कटात सामील आहेत, असे एनसीबीने आपल्या जबाबात म्हटले आहे.
आर्यन खानवर कॉन्ट्राबँडच्या खरेदीसाठी वापर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. एवढेच नाही, तर मर्चंटकडून अमली पदार्थदेखील जप्त करण्यात आले आहे. तसेच, परदेशातील व्यवहारांशी संबंधित तपास केला गेला पाहिजे आणि तो केलाही जात आहे, असे एनसीबीने म्हटले आहे.
आर्यन खानच्या वकिलांचे खळबळजनक दावे
मुंबईतील समुद्रात एका क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावेळी आर्यन खानच्या वकिलांनी काही खळबळजनक दावे केले आहेत. जाणून घेऊयात…
आर्यन खान याच्या जामीन अर्जावर आज कोर्टात सुनावणी झाली. शाहरुख खाननं आयर्नला जामीन मिळावा यासाठी सतीश मानेशिंदे यांच्यानंतर आता गुन्हे प्रकरणात निष्णात असलेल्या अमित देसाई यांच्याकडे खटला सोपवला आहे. ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी आज युक्तीवादात अनेक महत्त्वाचे दावे आणि खुलासे केले. यात त्यांनी एनसीबीच्या कार्यपद्धती व तपासावरही काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “ज्या मुलाकडे एनसीबीला काहीच सापडलं नाही अशा मुलावर थेट अवैध तस्करीचा आरोप करणं हे खूप हास्यास्पद आहे. एनसीबीला आर्यन खानकडून काहीच सापडलेलं नाही ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी”, असं अमित देसाई कोर्टात म्हणाले.
एनसीबीच्या चौकशीत अरबाज मर्चंट यानंही आर्यनकडे काहीच सापडलं नाही याची कबुली दिली होती, असंही देसाईंनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. दरम्यान, एनसीबीकडून युक्तीवाद करणाऱ्या अनिल सिंह यांनी आर्यन खान याला ड्रग्जच्या खरेदी आणि विक्रीबाबतची सर्व माहिती आधीपासूनच माहित होती असा दावा कोर्टात केला. गेल्या १० वर्षांहून अधिक काळातापासून आर्यन हा अरबाज मर्चंटच्या संपर्कात आहे. अरबाजकडून जे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. ते अरबाज आणि आर्यन दोघंही घेणार होते. एनसीबीला केवळ आर्यन आणि अरबाज यांची चिंता नाही. ही एक संपूर्ण साखळी आहे आणि ती उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीनं एनसीबीचा तपास सुरू आहे, असं अनिल सिंह यांनी कोर्टाला सांगितलं.
आर्यन खाननं ड्रग्ज घेतलेलं नाही आणि त्याच्याकडून कोणताही अंमली पदार्थ देखील एनसीबीनं जप्त केलेला नाही, यावर अमित देसाई यांनी युक्तीवादात जास्तीत जास्त भर दिला. “जर आर्यनकडून कोणतीही रक्कम जप्त झालेली नाही. म्हणजे त्याचा अमली पदार्थ खरेदी करण्याचा कोणताही इरादा नव्हता हे स्पष्ट होतं. त्याच्याकडे काहीच सापडलं नाही. तो कसलीही खरेदी किंवा विक्रीसाठी तेथे नव्हता”, असं अमित देसाई यांनी म्हटलं.
आर्यनच्या जामीन अर्जावर यावेळी कडाडून विरोध करत अनिल सिंह यांनी आर्यन ड्रग्ज रॅकेटशी संपर्कात असून अवैध तस्करीत त्याचा समावेश असल्याचा धक्कादायक आरोप करत जामीन नाकारण्याची मागणी केली.
त्यावर अमित देसाई चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. “आर्यनवर करण्यात आलेले आरोप किती गंभीर स्वरुपाचे आहेत याची कल्पना कदाचित सिंह यांना नाही. एनडीपीएस कायद्याअंतर्गत अवैध तस्करी म्हणजे काय हे सिंह यांना नक्की माहित असेल यात शंका नाही”, असा टोला अमित देसाई यांनी लगावला. “ज्या मुलाकडे काहीच सापडलं नाही. त्याचा कोणत्याच रॅकेटशी काही संबंध असण्याचं कारण नाही. जो त्या कथिक क्रूझवर देखील नव्हता. अशा मुलावर थेट अवैध तस्करीचा आरोप करणं अतिशय हास्यास्पद गोष्ट आहे”, असं देसाई म्हणाले.
देसाईंच्या दाव्यानंतर कोर्टरुममध्ये सर्वांच्याच भुवया उंचावल्या. “अटकेत असलेले आरोपी हे तरुण मुलं आहेत. सध्या अनेक देशांमध्ये या पदार्थांना वैधता देखील आहे. त्यामुळे जामीनामध्ये दंड केला जाऊ नये. त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. आतापर्यंत त्यांनी खूप सहन केलं आहे. त्याचा त्यांना चांगला धडा देखील मिळाला आहे. ते काही पेडलर, रॅकेटर्स आणि तस्कर नाहीत. एक देश म्हणून आपण आता खूप पुढे आलो आहोत. जिथं अमली पदार्थ बाळगण्याची शिक्षा २००१ साली पाच वर्ष इतकी होती. ती कमी करुन आता १ वर्ष करण्यात आली आहे”, असं अमित देसाई म्हणाले.