फडणवीस यांचे विधान बेजबाबदारपणाचे, अमरावतीतील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करु नये !
यशोमती ठाकूर यांचा भाजपला इशारा

अमरावती : अमरावती येथील वातावरण बिघडण्याचा भाजपने प्रयत्न करू नये. अमरावतीची जनता अशा द्वेषाच्या राजकारणाला बळी पडणार नाही. १२ आणि १३ तारखेला अमरावतीत जे घडलं तो अमरावतीच्या इतिहासातील काळा अध्याय होता, आता याचं राजकारण करून कोणी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये, अशी प्रतिक्रिया अमरावतीच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना ॲड यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या जनतेचे आभार मानले. अमरावतीची जनता सूज्ञ आहे, ते दंगेखोरांच्या प्रचाराला बळी पडणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमरावती येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्यातील जनतेने सरकारला मोठ्या प्रमाणावर मदत केली. राज्याला या प्रसंगी शांतता हवीय हेच यातून दिसते. मी राज्याच्या जनतेचे आभार मानते, राज्याला शांतता हवीय आणि हे सरकार कुठल्याही प्रकारे शांतता भंग होऊ देणार नाही, असंही ठाकूर म्हणाल्या.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जबाबदार नेते आहेत, मात्र त्यांना मतांच्या राजकारणापोटी राज्याचं वातावरण बिघडवायचं आहे असं दिसतंय. अमरावतीत १२ आणि १३ तारखेला घडलेल्या दोन्ही घटना तितक्याच दुर्दैवी आणि निंदनीय आहेत. दोन्ही घटनांमध्ये सामील असलेल्यांवर कारवाई सुरू आहे, इतकेच नव्हे तर या घटनांचा वापर करून सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचा ही विशेष पथकामार्फत तपास सुरू असल्याचंही त्या म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौरा करून तेथील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. अमरावतीने नेहमीच सर्वांचं स्वागत केले आहे, पण अमरावतीत येऊन त्यांनी शांततेचं आवाहन केलं असतं तर बरं झालं असतं, मात्र त्यांनी या घटनेचं राजकारणच करण्याचा प्रयत्न केला आहे,” असंही त्या म्हणाल्या. आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देवेंद्र फडणवीस यांनी १३ तारखेची घटना चुकीची आहे हे मान्य केलंय, मात्र याची जबाबदारी घेऊन एक शांत शहर अशांत केल्याप्रकरणी राज्याची माफी त्यांनी मागितली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
१२ तारीख आणि १३ तारखेच्या दोन्ही मोर्चांची योग्य दखल घेतली गेलीय. कोणालाच सोडणार नाही ही सरकारची भूमिका आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस अर्धवट माहिती देत आहेत अशी टीका ही त्यांनी केली आहे. रझा अकादमी चे राजकीय लागेबांधे कुणाशी आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. रझा अकादमीवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत गृहविभाग कारवाई करत आहे, त्याबाबत राज्याचे गृहमंत्री लवकरच माहिती देतील, तसंच या घटनेची राज्याच्या मंत्रिमंडळात ही चर्चा केली जाईल, अशी माहिती ही यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
विरोधी पक्षनेत्यांचे फिरणे भडकावणे कसे; भाजप नेते शेलारांचा सवाल
भाजप नेते आशिष शेलार यांनी अमरावतीच्या पालकमंत्री आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर शरसंधान साधत देवेंद्र फडणवीसांची जोरदार पाठराखण केली. यशोमती ताई फिरतात, पण विरोधी पक्षनेत्यांचे फिरणे भडकावणे कसे, असा सवाल त्यांनी केला. शिवाय हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणीही केली.
अमरावती हिंसेवरून देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. पालकमंत्री यशोमती ठाकूर या घटनेवर मौन का? असा सवालही त्यांनी केला होता. फडणवीसांची ही पत्रकार परिषद होताच यशोमती ठाकूर यांनी मीडियाशी संवाद साधत फडणवीसांच्या आरोपांचं खंडन केले. फडणवीस जबाबदार नेते आणि विरोधी पक्षनेते आहेत असे वाटले होते. पण त्यांनी आज बेजाबाबदारपणे विधाने केली. फडणवीसांची एकदोन वक्तव्य आवडली नाहीत. ते भडकवत असल्यासारखं वाटले. हिंदू-मुस्लिम करू नका. अर्धवट माहिती घेऊन ते बोलत आहेत. त्यांनी पूर्ण अभ्यास करावा. त्याच्या पत्रकार परिषदेवर माझा आक्षेप आहे. १२ ची घटना निंदनीय आहे. पण १३ तारखेची घटना त्यापेक्षाही अधिक निंदनीय आहे. दोन्ही आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. महाविकास आघाडी सरकार निष्पक्षपाती भूमिका घेत आहे. ज्यांनी कोणी दंगल भडकवली त्याला सोडलं जाणार नाही. आता अमरावती शांत झाले आहे. कोणीही बाहेरून येऊन आमच्या अमरावतीला भडकावू नका, असे आवाहन ठाकूर यांनी केले.
ठाकूर यांना उत्तर देताना शेलार म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची भूमिका देवेंद्रजींनी स्पष्ट केली आहे. राडा आणि दंगल होवू नये हे खरे आहे. मात्र, मात्र हिंदूंवर हल्ले होऊ नयेत. हल्लेखोरांवर कारवाई करावी ही मागणी रास्त आहे. यशोमती ताई फिरतात. ते चालते. मग विरोधी पक्षनेत्यांचे फिरणे हे भडकावणे कसे, असा सवाल त्यांनी केला. शेलारांनी शिवसेनेवरही टीका केली.




