वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फेसबुकने मोठा दणका दिला आहे. फेसबुकने त्यांच्यावर दोन वर्षांसाठी बंदी घातली असून त्यांना जानेवारी २०२३ पर्यंत फेसबुकचे कोणतेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरता येणार नाहीत. तसेच भविष्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जगभरातील मोठ्या नेत्यांविरोधातही कठोर पावले उचण्याचे संकेत फेसबुकने दिले आहेत.
ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी ६ जानेवारीला ‘कॅपिटॉल’ या संसदेच्या इमारतीमध्ये धुडगूस घातला होता. त्यावेळी ट्रम्प यांनी सोशल मीडियावर हिंसा भडकावणाऱ्या पोस्ट केल्यामुळे फेसबुकने त्यांचे अकाऊंट बंद केले होते. त्यानंतर मे मध्ये फेसबुकच्या स्वतंत्र मंडळाने हा निर्णय कायम ठेवला. असे असले तरी ट्रम्प यांच्यावर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्याचा निर्णय योग्य नसून योग्य प्रतिक्रिया देण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी मागितला होता. ट्रम्प यांच्यावर घालण्यात आलेल्या बंदीचा कालावधी जानेवारीपासून सुरु होणार असून त्यांनी नियमांचे पालन केले, तरच त्यांचे अकाऊंट पुन्हा सुरु केले जाणार असल्याचे फेसबुकने स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांच्या कृतीमुळे आमच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे ते दंडास पात्र ठरले आहेत, असे फेसबुकने म्हटले.
राष्ट्राध्यक्षावर बंदी घालण्याची पहिलीच वेळ होती
ट्रम्प यांच्या प्रवक्त्यांनी मात्र या बंदीवर भाष्य करणे टाळले आहे. जगभरातील नामांकित नेत्यांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कोणती कारवाई करायची हा प्रश्न मागील काही काळात सोशल मीडिया कंपन्यांना पडला होता. ट्रम्प यांच्यावर ७ जानेवारीला जेव्हा पहिल्यांदा बंदी घालण्यात आली होती, तेव्हा ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी होते. त्यामुळे फेसबुकने कोणत्याही राष्ट्रध्यक्ष, पंतप्रधान किंवा देशाच्या प्रमुखावर बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ होती.